लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याविरोधात कॉंग्रेसचेच नेते आशिष देशमुख यांनी दंड थोपटले आहेत. केदार यांच्यामुळे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बुडाली असल्याचा आरोप लावत त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा आरोप असल्याने त्यांना तातडीने मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवा, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. दरम्यान, या प्रकरणात केदार यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
१५० कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात सुनील केदार व इतर दहा आरोपींविरोधात न्यायालयात खटला सुरू असून तो सुनावणीच्या अंतिम टप्प्यात आहे. केदार यांच्यामुळे वर्धा जिल्हा बँक, उस्मानाबाद जिल्हा बँकांचेदेखील नुकसान झाले. सहकार खात्याच्या तीन अंकेक्षकांनी केदार यांनाच मुख्य आरोपी म्हणून दोषी ठरविले आहे. सुनावणी अंतिम टप्प्यात असताना ज्योती वजानी यांच्या जागी सरकारी वकील म्हणून केदार यांनी स्वत:चे मित्र आसिफ कुरेशी यांची नियुक्ती करवून घेतली आहे. कुरेशी हे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या लीगल सेलचेदेखील अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक तातडीने रद्द करण्यात यावी. त्यांच्या जागेवर उज्ज्वल निकम यांच्यासारख्या सक्षम वकीलाची नेमणूक करावी, अशी मागणीदेखील देशमुख यांनी या पत्रातून केली आहे. केदार यांचा इतिहास गुन्हेगारीचा राहिला आहे. अशी चारित्र्यहीन व्यक्ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहणे ही राज्यासाठी शरमेची बाब आहे. त्यांच्याविरोधात स्वतंत्रपणे न्यायालयात खटला चालवावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली. २००९ च्या विधानसभा निवडणूकांत सावनेर मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर आशीष देशमुख यांनी केदार यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती हे विशेष.