लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत नागपुरात गेल्या वर्षी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर घोषित करण्यात आलेल्या कंटेन्मेंट झोन व या परिसरात बॅरिकेट्स लावण्यावर ५ कोटी ७१ लाखांचा खर्च करण्यात आला. शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत या खर्चाला मंजुरी देण्यात आली.
तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनाची पहिली लाट येताच संक्रमण रोखण्यासाठी बाधित रुग्ण आढळून आलेल्या वस्त्या सील केल्या होत्या. यासाठी बॅरिकेट्स व टीन लावण्यात आले होते. यात सर्वाधिक १ कोटी ११ लाखांचा खर्च मंगळवारी झोनमध्ये करण्यात आला. धरमपेठ झोनमध्ये १ कोटी ४ लाख, धंतोली झोनमध्ये ९८ लाख ३ हजार, नेहरूनगर झोनमध्ये ९६ लाख ५४ हजार, आशीनगर झोन ७९ लाख ७६ हजार, हनुमाननगर झोन ३७ लाख ३५ हजार, लक्ष्मीनगर झोन २६ लाख ९५ हजार, लकडगंज झोन १६ लाख ९८ हजार खर्च करण्यात आले. गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमध्ये यासाठी वॉर्ड निधी खर्च करण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी दिली.
मनपा शाळातील इयत्ता दहावीतील १७२३, तर बारावीच्या २१५ विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी टॅबलेट खरेदीसाठी १ कोटी ७५ लाख खर्चाचा प्रस्ताव शिक्षण विभागाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला. तसेच स्टेशनरी, विद्यार्थ्यांंना स्कूल बॅग व वॉटर बॉटल खरेदीसाठी ७७ लाख ३५ हजार खर्चाच्या मंजुरीचा प्रस्ताव पाठविला. याला समितीने मंजुरी दिली. तसेच विद्युत विभागाच्या ४५.७९ लाखाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.
झोननिहाय कंटेन्मेंट झोनवरील खर्च
लक्ष्मीनगर -२५.९५ लाख
धरमपेठ -१.४ कोटी
मंगळवारी-१.११ कोटी
धंतोली -९८.०३ लाख
नेहरूनगर -९६.५४ लाख
आशीनगर -७९.७६ लाख
हनुमाननगर -३७.३५ लाख
लकडगंज-१६.९८ लाख