नागपूर - परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या पथकाने लकडगंजमध्ये घातक नायलॉन मांजा अन् बनावट महागड्या सिगारेटस् असा साडेसात लाखांचा मुद्देमाल गुरुवारी जप्त केला. या प्रकरणी जय रोड लाईन्सच्या एजंटला अटक करण्यात आली असून, दिल्लीतील ट्रान्सपोर्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
उपायुक्त राजमाने यांच्या पथकातील एपीआय विलास पाटील, सतीश गवई आणि सहकारी गुरुवारी दुपारी लकडगंज परिसरात गस्त करीत होते. त्यांना जय रोड लाईन्सचा एक ट्रक संशयास्पद अवस्थेत दिसला. पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता त्यात १३० मांजाच्या चक्री आढळल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या. सोबतच २०० सिगारेटस् चे पाकिटही जप्त केले. या सिगारेटस् ची किंमत ६ लाख, ५० हजार रुपये आहे. विशेष म्हणजे, सिगारेटस् च्या पाकिटवर कोणत्याही प्रकारचा वैधानिक ईशारा लिहिलेला नाही. पोलिसांनी हा ७ लाख, १५ हजारांचा मुद्देमाल तसेच १० लाख, ५० हजारांचा ट्रक असा एकूण १७ लाख, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी जय रोड लाईन्सच्या एजंटला ताब्यात घेतले. तर, त्याचा मालक (ट्रान्सपोर्टर) दिल्लीत राहतो. त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. एपीआय विलास पाटील पुढील तपास करीत आहेत.
किराणा दुकानात आढळला गुटखा
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांच्या पथकाने नवीन कामठी परिसरात एमएच ४९- एआर ८२८० क्रमांकाचा ऑटो पकडून त्यातील २ लाख, ३० हजारांचा प्रतिबंधित विमल तसेच दुसऱ्या कंपनीचा गुटखा जप्त केला. या प्रकरणात आरोपी ऑटोचालक शाम मिरसिंग कटारे (वय ३३, रा.यादवनगर) याला अटक करण्यात आली. उपायुक्त कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, एपीआय सुरेश कन्नाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
गुटख्याची दुसरी कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनच्या पथकाने क्रिडा चाैकात केली. रोशन अजाबराव देशमुख या किराना दुकानदाराकडे बुधवारी रात्री १० च्या सुमारास छापा घातला. आरोपी देशमुखने दुकानाच्या बाजुला लपवून ठेवलेला ४ लाख, ५० हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावार, सहायक निरीक्षक पवन मोरे, माधूरी नेरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.