लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ३५० कोटींपेक्षा अधिक रुपयांची ठगबाजी करणारा इबिड ट्रेडर्सचा सूत्रधार सुनील कडियालाचे आंध्र प्रदेशातील अनेक बड्या नेत्यांसोबत कनेक्शन आहे. त्याच्यावर कोणतेही संकट आले की ही नेतेमंडळी त्याच्या पाठीशी उभे राहायची. या बदल्यात कडियाला नेत्यांना कोट्यवधी रुपये किमतीच्या आलिशान कार गिफ्टमध्ये द्यायचा. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना या संदर्भात पुरावे हाती लागले आहेत. मात्र नेत्यांना गुंतवणुकीच्या बदल्यात कार दिल्या होत्या, असे आता नेत्यांना वाचविण्यासाठी कडियाला सांगत आहे.
‘लोकमत’ने ९ ऑगस्टला या प्रकरणाला वाचा फोडली. कडियाला याने चार वर्षापूर्वी आंध्र प्रदेशातील अनंतपुरम येथून इबिड ट्रेडर्स या नावाने ठगबाजीला सुरुवात केली होती. अल्प कालावधीत तो प्रसिद्धीस आला. दरम्यान वेळेवर पैसा न मिळाल्याने काही मोठ्या गुंतवणूकदारांनी अनंतपुरातील गँगस्टर्सकडे त्याच्याकडून वसुली करण्याचे काम सोपविले होते. पोलीसही त्याची माहिती काढण्याच्या कामी लागले होते. यातून वाचण्यासाठी त्याने आंध्रप्रदेशातील बड्या नेत्यांशी हातमिळवणी केली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, कडियालाने नेत्यांना जगुआर आणि मर्सिडीजसारख्या सेकंडहँड कार गिफ्ट दिल्या होत्या. या बदल्यात नेत्यांनी पोलिसांना शांत केले. यामुळेच ठगबाजीचा गुन्हा दाखल होऊनही अनंतपूर पोलीस त्याला पकडू शकले नव्हते. त्याने अटकपूर्व जामीन मिळविण्याचे प्रयत्न केले. याच दरम्यान आंध्र प्रदेशातील काही मोठे गँगस्टर्स कडियालाला कायमचा संपविण्याच्या मागे लागले. मात्र तो हाती न लागल्याने त्याच्या साथीदारांचे अपहरण करून बेदम धुलाई केली होती. या गँगस्टर्सना शांत करण्याचेही काम नेत्यांनीच केले. या दरम्यान कडियालाकडून नेत्यांना महागड्या लक्झरी कार भेट म्हणून दिल्याचे कळल्यावर गुंतवणूकदारांकडून दबाव वाढला. त्यावर, आपण जुन्या कारच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याचे सांगणे त्याने सुरू केले. अग्रिम जमानत याचिका रद्द होत असल्याचा अंदाज येताच तो अनंतपुरमहून पळून नागपुरात आला. येथे आल्यावर आधी कळमना व नंतर बजाज नगरात कार्यालय सुरू करून ठगबाजी सुरू केली.
...
८ कोटींची संपत्ती जप्त
पोलिसांनी सुनील कडियालाने जमविलेली ८ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. या रॅकेटमध्ये त्याची पत्नी, भाऊ आणि अन्य नातेवाईकही सहभागी आहेत. ते आता कडियालाच्या बेनामी संपत्तीच्या व्यवस्थेत लागले आहेत. त्याची अनेक शहरांमध्ये बेनामी संपत्ती असल्याची माहिती आहे. पोलिसांचा अगदी तळापर्यंत तपास सुरू असून कोणालाही सोडले जाणार नाही, असे डीसीपी नुरुल हसन यांनी सांगितले. बजाजनगर व कळमना पोलिसातही गुन्हे दाखल असून ते सुद्धा कारवाई करणार आहेत.
...