लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विशेष तृतीय वर्ष वर्गात सर्व जण एकच आहेत याचा अनुभव येतो. हा वर्ग स्वयंसेवकांसाठी एका साधनेप्रमाणे आहे. संघाच्या शिबिरांमध्ये नेहमीच राष्ट्रीय एकात्मतेची अनुभूती येते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह व्ही.भागय्या यांनी केले. संघाच्या विशेष तृतीय वर्ष वर्गाला सोमवारपासून सुरुवात झाली. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संघ शिक्षा वर्गासाठी देशाच्या विविध भागातून आलेल्या स्वयंसेवकांचे त्यांनी स्वागत केले. या वर्गात सहभागी होण्यासाठी स्वयंसेवकांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असते. या वर्गात आलेले सर्व अनुभवी स्वयंसेवक आहेत. शास्त्रात सांगण्यात आलेल्या धैर्य, क्षमा, संयम, अस्तेय, इंद्रिय निग्रह, बुुद्धी, विद्या, सत्य तसेच क्रोधावर विजय सारख्या गुणांची या वर्गात उपासना करायची आहे. सोबतच आयुष्यभर हे गुण जोपासण्यासाठीदेखील प्रयत्न करायचे आहेत, असे व्ही.भागय्या म्हणाले.आपल्या ध्येयाप्रति निष्ठा, विचारधारेची स्पष्टता, आत्मियता, कठोर परिश्रम, शिस्त हे संघ स्वयंसेवकांचे विशेष गुण आहेत. आपल्या वागणुकीतून हे गुण प्रकटले पाहिजेत. स्वयंसेवकांनी शारीरिक कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे. विशेषत: योग व आसनात प्राविण्य मिळविले पाहिजे. संघाच्या विविध उपक्रमांबाबत मनात स्पष्टता असायला हवी. २५ दिवसांच्या साधनेत पूर्ण मनाने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.या विशेष वर्गात संपूर्ण देशातून ४० ते ६५ या वयोगटातील ८५२ स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष गोविंद शर्मा हे वर्गाचे सर्वाधिकारी आहेत. हरियाणाचे प्रांत कार्यवाह सुभाष आहुजा हे वर्ग कार्यवाह आहेत. धर्म जागरण समन्वय विभागाचे अ.भा.सहप्रमुख राजेंद्रकुमार हे पालक अधिकारी आहेत. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सहसरकार्यवाह मुकुंद सी.आर. अ.भा.शारीरिक प्रमुख सुनील कुलकर्णी, अ.भा.बौद्धिक प्रमुख स्वांत रंजन, अ.भा.सहबौद्धिक प्रमुख सुनील मेहता, अ.भा.व्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे उपस्थित होते.
संघ शिबिरात राष्ट्रीय एकात्मतेची अनुभूती : व्ही.भागय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:44 AM
संघाच्या शिबिरांमध्ये नेहमीच राष्ट्रीय एकात्मतेची अनुभूती येते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह व्ही.भागय्या यांनी केले.
ठळक मुद्देराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विशेष तृतीय वर्ष वर्गाला सुरुवात