नागपूर : वर्षभर सोबत राहणारी सावली बुधवारी दुपारी नागपूरकरांची साथ सोडून जाणार आहे. उपराजधानीत बुधवारी दुपारी १२.१० वाजता शून्य सावली अनुभवता येणार आहे. अनेक अभ्यासक याची प्रतीक्षा करत असले तरी ढगाळ वातावरणामुळे हा योग जुळून येईल की नाही, अशी शंकादेखील उपस्थित करण्यात येत आहे.
सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायण असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५० अंशावर दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त यादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायण होताना एकदा. सूर्य दररोज ०.५० अंश सरकतो, म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर २ दिवस राहातो, त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते. नागपुरात दुपारी १२.१० वाजता मोकळ्या जागी, घराच्या छतावर किंवा अंगणात निरीक्षण करता येईल.