नागपूर : विषमुक्त अन्न खा, असे आवाहन सारेच करतात! मात्र आपण खरंच विषमुक्त अन्न खातो का, हा सध्या जागतिक व्यासपीठावर संशोधनाचा विषय ठरतो आहे. शेवटी विषमुक्त अन्न (धान्य) म्हणजे काय? ते कसे तपासायचे, हाही एक प्रश्नच आहे. मग शेतीच विषमुक्त केली तर येथील उत्पादनही विषमुक्त होईल, हा उदात्त हेतू पुढे ठेवत रामटेक तालुक्यातील ११३ शेतकऱ्यांनी एकत्र येत गत दोन वर्षापासून ३०० हेक्टर क्षेत्रात विषमुक्त शेती अभियान सुरू केले आहे.
या अभियानाला सध्या विविध व्यासपीठावर मान्यताही मिळत आहे. शेतीत रासायनिक खताचा शून्य वापर तसेच जैविक खते व कीटकनाशकचा योग्य पद्धतीने अवलंब हे या अभियानाचे मुख्य सूत्र आहे. यासाठी रामटेक तालुक्यात काही शेतकऱ्यांनी एकत्रित येत विषमुक्त शेतीचा संकल्प केला आहे. विषमुक्त उत्पादन तयार करून उत्तम आरोग्यदायी समाज घडविणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत पिकावर येणाऱ्या विविध रोगांचा तपास करण्यासाठी ॲग्रीकल्चर क्लिनिकही (शेतकरी मार्गदर्शनही) स्थापन करण्यात आले आहे. शेतीतज्ज्ञ डॉ. गिरीश काठीकर यांच्या मार्गदर्शनात येथे शेतकऱ्यांना नियमित मार्गदर्शन केले जाते. पिकावर रोग येण्यापूर्वीच उपचार हा या ॲग्रीकल्चर क्लिनिकचा मुख्य उद्देश आहे. तालुक्यात नवरगाव, सोनेघाट, चौघान, संग्रामपूर परिसरातील शेतकरी या क्लिनिकचा उपयोग पिकांची उत्पादकता व गुणवत्ता वाढवून घेण्यासाठी करीत आहे.
शेतकऱ्यांनी गत २५ ते ३० वर्षांपासून रासायनिक खताचा व कीटकनाशकाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. यामुळे उत्पादन वाढले, मात्र जमिनीची सुपीकता कमी झाली. त्यामुळे जमिनीची सुपीकता हळूहळू परत यावी अर्थात पूर्ववत व्हावी याकरिता दर आठवड्याला या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. शेतकऱ्यांनी नगदी पिके घेतली पाहिजे. भाजीपाला, फळबागा, फुलशेतीतून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे काम या विषमुक्त शेती अभियानामध्ये करण्यात येत आहे. डॉ. गिरीश काठीकर यांच्या मार्गदर्शनातून व तसेच त्यांनी संशोधनातून निर्माण केलेले विविध जैविक कीटकनाशके व खते यातून हा प्रकल्प साकारला जात आहे.
रासायनिक खते आणि कीटकनाशकाच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे, हे वास्तव आहे. मात्र याचा माणवी आरोग्यावरही परिणाम होत आहे. हे विष जेवणाच्या माध्यमातून सर्वच लोकांच्या पोटामध्ये जात आहे. यामुळे प्रत्येक घरामध्ये कुणी ना कुणीतरी एका विशिष्ट आजाराने ग्रासलेला आहे. त्यामुळे समाजाला या सर्व त्रासातून मुक्त करण्याकरिता व उत्तम आरोग्यदायी समाज बनविण्याच्या उद्देशाने शेतकरी विषमुक्त शेतीकडे वळणे अत्यंत गरजेचे आहे.
विषमुक्त शेतीचे अभियान रामटेक तालुक्यात खरीप हंगाम २०२० पासून राबविल्या जात आहे. आज आमच्या शेतकरी गटाच्या माध्यमातून जवळपास १५० टन तांदूळ, १५० टन गहू, मोठ्या प्रमाणावर तूर, हरभरा व भाजीपाल्याचे उत्पादन केेले जात आहे. ते विविध संस्था तसेच आऊटलेटधारकांना वर्षभर पुरविण्याचा मानस आहे. या विषमुक्त शेती अभियानासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. कमी खर्चात जास्त उत्पादन व जास्त भाव यासोबतच उत्तम आरोग्यदायी समाजाची निर्मिती, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
- डॉ. राजेश ठाकरे, संयोजक, विषमुक्त शेती उपक्रम.
डॉ. गिरीश काठीकर यांनी विविध प्रकारच्या संशोधनाच्या माध्यमातून लाभकारी जैविक खते व कीटकनाशके औषधे तयार केली. तसेच ग्रुपमधील शेतकऱ्यांना वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. विषमुक्त शेतीमध्ये पारंपरिक शेतीपेक्षा उत्पादन जास्त होत आहे. समाजानेसुद्धा यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, तरच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.
- रमेश माकडे, शेतकरी, सोनेघाट
३० वर्षांपासून मी शेतीव्यवसायात आहे. विविध प्रकारच्या पिकांवर गुणकारी जैविक खते व औषधे कीटकनाशके मी तयार करीत असून, त्याचा उपयोग आपल्याही परिसरातील शेतकऱ्यांना व्हावा, या उदात्त हेतूने रामटेक तालुक्यात विषमुक्त शेती अभियान आम्ही सुरू केले आहे. दर आठवड्याच्या बैठकीला शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण केले जाते. या अभियानात सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील धान्य देशातील नामांकित प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यात सर्वस्व सॅम्पल विषमुक्त आले.
- डॉ. गिरीश काठीकर, मुख्य संयोजक, विषमुक्त शेती अभियान