नागपूर: आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होतो आहे. मात्र कौटुंबिक नात्यांमध्ये देखील दुरावा निर्माण होत असल्याचे सामाजिक चित्र आहे. कौटुंबिक नात्यांमध्ये आलेला दुरावा ‘एक्सपायरी डेट’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकांकिकेमधून दर्शविण्यात आला. या एकांकिकेने प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळविली. मुले शिकून विदेशात जातात. त्यानंतर कौटुंबिक नाते जपण्यात त्यांना काही वेळ मिळत नाही. वृद्ध आई-वडिलांना एकटे सोडून त्यांच्या मृत्यूचा अर्थात 'एक्सपायरी डेट'चा कसा इव्हेंट केला जातो. याचे भावस्पर्शक सादरीकरण या एकांकिकेमधून करण्यात आले आहे.
मुलगा विदेशातूनच आपल्या आई-वडिलांची भविष्यातील मृत्यूची काळ वेळ आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे माहिती करण्याचा प्रयत्न करतो. मृत्यूची काळ-वेळ निश्चित झाली की आपल्याला येता येईल, असा मुलाचा समज असतो. या एकांकिकेत नेहरू नामक पात्राची एक्सपायरी डेट ही १४ ऑगस्टच्या रात्री असते. या एक्सपायरी डेटच्या निमित्ताने विविध इव्हेंट कसे केले जातात याचे देखील सादरीकरण यात करण्यात आले.
मुलगा विदेशातून येतो, मृत्यूच्या निश्चित वेळेस त्याच्या वडीलास केवळ अस्वस्थ वाटते. 'एक्सपायरी डेट' नंतर देखील वडिलांना जिवंत बघून मुलगा वैतागून निघून जातो. यानंतर पती पत्नी हेच एकमेकाचे अंतिम साथीदार असल्याचे सुंदर सादरीकरण यात करण्यात आले. या एकांकिकेमध्ये ब्रायन डोंगरदिवे, सिफा अन्सारी, जयंत कुरजेकर, नितीन मरसकोल्हे, वेदश्री राजुरकर, गायत्री श्रृंगारपूरकर, हर्ष दयारामानी यांनी अभिनय केला आहे. एकांकिकेचे दिग्दर्शन सारंग गुप्ता व जय गाला यांनी केले तर संगीत मोहित सरकार यांनी दिले आहे.
या विद्यापीठांच्या संघाने केले सादरीकरण गांधीनगर विद्यापीठ गुजरात, डी. वाय. पाटील विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, गणपत विद्यापीठ मेहसाणा गुजरात, सरदार पटेल विद्यापीठ आनंद गुजरात, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, पारुल विद्यापीठ वडोदरा, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, महाराजा कृष्णकुमारसिंहजी भावनगर विद्यापीठ भावनगर गुजरात, हेमचंद्राचार्य नॉर्थ गुजरात विद्यापीठ पाटण गुजरात, निरमा विद्यापीठ, गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अहमदाबाद गुजरात, भक्त कवी नरसिंह मेहता विद्यापीठ जुनागढ, गुजरात विद्यापीठ अहमदाबाद, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी देखील सादरीकरण केले.