बोगस ज्योतिषी व मांत्रिक घेतात गैरफायदा : बदनामीच्या भीतीने तक्रारच होत नाही जगदीश जोशी नागपूर भविष्य सांगण्याच्या बहाण्याने एका विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्याचे ताजे उदाहरण उघडकीस आले. याप्रमाणे महिलांचे शोषण सुरू सातत्याने सुरू आहे. बोगस ज्योतिषी किंवा मांत्रिक अंधविश्वासात फसलेल्या महिलांचा गैरफायदा घेऊन त्यांचे शोषण करतात. बदनामीच्या भीतीने महिला तक्रारच करीत नाही. एखादा मोठा गुन्हा झाला तरच प्रकरण पोलिसांपर्यंत येते, अन्यथा प्रकरण उघडकीसच येत नाही. सदर पोलिसांनी ४० वर्षीय अमरिश शर्मा याला अटक केली आहे. पीडित २० वर्षीय विद्यार्थिनीची एका मैत्रिणीच्या माध्यमातून शर्मा याच्याशी ओळख झाली. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्याने विद्यार्थिनीचे अपहरण करून अत्याचार केला होता. यापूर्वी २०१२ मध्ये जरीपटका येथील संन्यालनगरात शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने नोटांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलांचे शोषण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. कथित मांत्रिक धनलाभाचे आमिष दाखवून गरीब महिलांना लक्ष्य बनवीत असे. तो महिलांना व्हिडिओ दाखवायचा. त्या व्हिडिीओमध्ये शारीरिक संबंध बनविल्यानंतर नोटांचा पाऊस पडत असल्याचे दिसत असे. या माध्यमातून तो महिला व मुलींचे शोषण करायचा. महिलांना फसविण्यासाठी त्याने एका महिलेला ठेवले होते. त्याच्या या कृत्याची भनक लागताच संन्यालनगरातील संतप्त नागरिकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला पकडले. परंतु बदनामीच्या भीतीने एकही महिला तक्रारीसाठी पुढे आली नाही. परिणामी गुन्हा दाखल होऊ शकला नाही. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करीत त्याला सोडून दिले. त्याचप्रकारे डिसेंबर २०१५ मध्ये जरीपटक्यातील बाबादीपसिंहनगर येथे जादूटोण्याने सर्व अडचणी दूर करण्याचे आमिष दाखविणाऱ्या एनएडीटीतील कर्मचाऱ्याचा खून करण्यात आला होता. मांत्रिक पत्नीपासून दूर राहत होता. त्याच्याकडे येणाऱ्या बहुतांश महिलाच होत्या. तो त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करीत असल्याच्या संशयातून पत्नीनेच एका युवकाला आपल्या प्रेमात अडकवून त्याच्या माध्यमातून मांत्रिकाचा खून केला होता. महिलांमध्ये भीती शर्मा याच्याकडे अनेक लोक आपले भविष्य माहीत करून घेण्यासाठी येत होते. यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ताज्या प्रकरणामुळे त्या सर्व महिला तणावात आहेत. त्यांचे कुटुंबीय याबाबत विचारपूस करतील, याची त्यांना भीती आहे. काही लोकांनी तर सदर पोलीस ठाण्यात जाऊन विचारपूससुद्धा केली आहे.
अंधविश्वासातून महिलांचे शोषण
By admin | Published: January 19, 2017 2:46 AM