नागपूर : नागपूरवरून अमरावतीकडे जात असलेल्या सिलिंडरच्या वाहनातून फायर सिलिंडरचा गॅस लिक झाली. यानंतर गाडीतील सिलिंडर ५० मीटर उंच उडून नजीकच्या इलेक्ट्रिकल दुकानाच्या छतावर जाऊन फुटले. ही घटना गुरुवारी दुुपारी १.३० वाजेच्या सुमारास नागपूर - अमरावती महामार्गावरील चौदा मैल चौरस्ता परिसरात घडली.
हिंगणा एमआयडीसीतील रुख्मिनी मेटल्स येथून १७ ऑक्सिजन सिलिंडर व १६ फायर सिलिंडर असे एकूण ३३ सिलिंडर भरून चालक प्रकाश अंबूलकर (रा. महादेव खोरी, नवीन बायबास, अमरावती) हा वाणी एजन्सीचा मिनी ट्रक (क्र. एमएच २७ बीएक्स ५४९०) वाहनाने सिलिंडर भरून अमरावती येथील शासकीय सुपर रुग्णालयात घेऊन जात होता. चौदा मैल चौरस्ता बसस्थानकाजवळ मिनी ट्रक येताच त्यातील दोन फायर सिलिंडरमधून गॅस लिक झाला. त्यामुळे मिनी ट्रकमधून एक सिलिंडर बाजूला खाली पडला, तर दुसरा सिलिंडर हा वाहनाची काच फोडून ५० मीटर अंतरावर असलेल्या किशोर हटवार यांच्या इलेक्ट्रिकल दुकानाच्या टिनाच्या शेडवर पडला. यानंतर या सिलिंडरचा स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.