लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटके नागपूरची असल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे तपास यंत्रणांच्या नजरा पुन्हा एकदा नागपूरकडे वळल्या आहेत. अंबानी यांच्या बंगल्याजवळच स्फोटके भरलेले वाहन गुरुवारी दुपारी दिसून आल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. ज्या ठिकाणी स्फोटके भरलेले हे वाहन सापडले. त्याच्या जवळच्याच परिसरात रिझर्व बँकेचे गव्हर्नर, लता मंगेशकर तसेच मुंबई महापालिकेच्या आयुक्तांचे निवासस्थान आहे. जिंदाल हाऊस आणि जसलोक हॉस्पिटलही आहे. त्यामुळे स्फोटके असलेली कार तेथे सोडणारांची कसून चौकशी केली जात आहे. त्यासाठी अवघी तपास यंत्रणा कामी लागली आहे. वाहनातून जप्त करण्यात आलेल्या जिलेटिनच्या कांड्या नागपूर (बाजारगाव)च्या सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत तयार झाल्याचे तपासात उघड झाल्याने तपास यंत्रणांनी नागपूरकडे नजर वळविली आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सोलरच्या प्रशासनाकडे गुरुवारी रात्री प्रदीर्घ विचारपूस केली.