लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या दैवी शक्तीने कोरोनासारखा आजार क्षणार्धात पळवून लावणाऱ्या ढोंगी बाबाचे कारस्थान एमआयडीसी पोलिसांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने उधळून लावले. पोलिसांनी शुभम तायडे या ढोंगीबाबास जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत अटक केली असून, लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वीच अंनिसने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पंचशीलनगरात राहणाऱ्या शुभम तायडे नामक गुणवंतबाबाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने अंनिस कार्यकर्ते व पोलिसांच्या चमूने सापळा रचून त्याच्या दुष्कृत्याचा भंडाफोड केला. बाबा दैवी शक्तीने पैशाचा पाऊस पाडतो, सट्ट्याचा नंबर देतो, गुप्तधन शोधतो, आजार दूर करतो, भक्तांच्या घरातील भानगडी दूर करतो व स्वप्नात येऊन समस्यांचे निवारण करतो, असा दावा बाबाचे भक्त करत होते. त्याअनुषंगाने गुरुवारी बाबा पंचशीलनगर येथील स्वत:च्या घरी दर गुरुवारी दरबार थाटत होता. गुरुवारी १३ मे रोजी सापळा रचत पोलिसांनी रात्री ९ वाजता बाबाच्या दरबारात धाड टाकली. विशेष म्हणजे, राज्यात टाळेबंदीबाबतचे कठोर निर्बंध असतानाही यावेळी तेथे ५० च्या वर भक्तमंडळी गर्दी करून होते. यावेळी बाबाच्या अंगात शेषनाग संचारल्याने तो जमिनीवर सापासारखा आळोखेपिळोखे देत फुसफुस करत होता. मात्र, पोलीस दिसताच त्याचे फुसफुसणे अचानक बंद झाले. बाबा कोरोना संक्रमित रुग्णांना क्षणार्धात कोरोनामुक्त करतो, असे भक्त यावेळी सांगत होते. अशाच तऱ्हेने बाबा लोकांना स्वत:मध्ये दैवी शक्ती असल्याचे सांगून भीती दाखवत होता. मात्र, पोलिसांच्या अचानक झालेल्या उपस्थितीने त्याचा दैवी चमत्कार दूर पळून गेला. यावेळी पोलिसांनी बाबाला जादूटोणाविरोधी कायदा, महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अघोरी प्रथा २०१३ नुसार अटक केली. यासोबतच लॉकडाऊनमध्ये भक्तांना गोळा केल्याचा गुन्हाही त्याच्याविराेधात दाखल करण्यात आला. यावेळी अंनिसचे महासचिव हरीश देशमुख, महिला संघटिका छाया सावरकर, महानगर सचिव नरेश निमजे उपस्थित होते. ही कारवाई दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप झलके यांच्या मार्गदर्शनात एमआयडीसी पोलीस ठाणेदार युवराज हांडे, पोलीस उपनिरीक्षक कृपेश घोळके, हेड कॉन्स्टेबल कैलाश चौहान यांनी केली.
अटकेविरोधात भक्तांची पोलीस ठाण्यात गर्दी
बाबाला अटक केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी रात्री मोठ्या संख्येने भक्तांनी गर्दी केली होती. बाबाला सोडण्याची मागणी व पोलिसांविरोधात घोषणाबाजी यावेळी केली जात होती. मात्र, तुमच्या समस्या अंतर्ज्ञानाने कळणाऱ्या बाबाला स्वत:वरील कारवाईबाबत का कळले नाही, असे जेव्हा समजावून सांगण्यात आले. तेव्हा भक्तांची गर्दी ओसरायला लागली.