लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन तीन आठवडे झाले असून अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही अर्ज नोंदणी करता आलेली नाही. नियोजित वेळापत्रकानुसार २३ जुलै रोजी अर्ज भरण्याची अखेरची मुदत आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने अर्ज भरण्याच्या मुदतीला वाढ द्यावी, अशी विद्यार्थी व महाविद्यालयांकडून मागणी होत आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाने दहावीनंतरच्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांसाठी २९ जून रोजी प्रवेश प्रक्रियेची रुपरेषा जारी केली व ३० जूनपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. नागपूर विभागात ५० महाविद्यालयांमध्ये एकूण १३ हजार १२६ जागा आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहतात. मागील तीन आठवड्यांत फारसा प्रतिसाद लाभलेला नाही. यंदा दहावीचा निकाल ९९ टक्क्यांहून अधिक लागला. निकाल लागल्यानंतर काही विद्यार्थ्यांना इतर आवश्यक कागदपत्रे गोळा करता आलेली नाही. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
दुसरीकडे यंदा बंपर निकालांमुळे जास्त नोंदणी होईल, अशी महाविद्यालयांना अपेक्षा होती. मात्र उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्ध्या अर्जांचीदेखील नोंदणी झालेली नाही. त्यामुळे संचालनालयाने मुदतवाढ द्यावी, अशी महाविद्यालयांची भूमिका आहे. यासंदर्भात शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.