लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी रोडवरील डॉ. आंबेडकर रुग्णालय व संशोधन केंद्राचा चार महिन्यांत मंजूर प्रस्तावानुसार विस्तार करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिला.यासंदर्भात कुणाल राऊत यांनी जनहित याचिका दाखल केली होती. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मनीष पितळे यांनी हा आदेश देऊन याचिका निकाली काढली. या रुग्णालयाची क्षमता ४६८ खाटांपर्यंत वाढविण्याचा निर्णय झाला असून, त्यासंदर्भात ४ मार्च २०१६ रोजी जीआर जारी करण्यात आला आहे. इंदोरा येथील खसरा क्र. १०१/३, १०२/२ व १०३/२ या जमिनीवर रुग्णालयाचा विस्तार करणे प्रस्तावित आहे. या जमिनीच्या वादामुळे रुग्णालयाचा विस्तार रखडला होता. त्यावर तोडगा निघाल्यामुळे विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.२ जानेवारी २०१२ रोजी मंत्रिमंडळाने या रुग्णालयाच्या विस्तारासाठी येणारा खर्च, जमिनीची उपलब्धता, सुविधा इत्यादीचा प्रस्ताव सादर केला होता. २० मार्च २०१२ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्याने यासंदर्भात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) पत्र लिहिले होते. तसेच, महसूल विभागाने रुग्णालयाच्या विकासाकरिता २५ जून २०१४ रोजी समिती स्थापन केली होती. परंतु, ठोस काहीच होत नसल्याचे पाहून राऊत यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. शैलेंद्र हारोडे व अॅड. रोहित चौगुले यांनी कामकाज पाहिले.
नागपुरातील डॉ. आंबेडकर रुग्णालयाचा विस्तार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 3:06 PM
कामठी रोडवरील डॉ. आंबेडकर रुग्णालय व संशोधन केंद्राचा चार महिन्यांत मंजूर प्रस्तावानुसार विस्तार करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिला.
ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : शासनाला चार महिन्याचा वेळ