नागपूर : देशातील सराफांकडे असलेल्या जुन्या दागिन्यांवर हॉलमार्कची नोंद करण्याची सरकारची ३१ ऑगस्ट २०२१ ही अंतिम तारीख आहे. पण, देशात हॉलमार्क सेंटरची अपुरी संख्या पाहता कमी कालावधीत नोंद होणे शक्य नसल्याने ही तारीख ३१ ऑगस्ट २०२२पर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया ज्वेलर्स अॅण्ड गोल्डस्मिथ फेडरेशनने (एआयजेजीएफ) केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.
सराफांकडे दागिन्यांचा भरपूर स्टॉक आहे. कोरोना काळ, अनेक समारंभ व कार्यक्रमांवर बंदी आणि सध्या दुकानांवर वेळेचे निर्बंध असल्यामुळे दागिन्यांच्या विक्रीवर विपरित परिणाम झाला आहे. विदर्भात १० हजारांपेक्षा जास्त सराफांच्या तुलनेत केवळ तीन हॉलमार्क सेंटर आहेत. त्यात अकोला एक आणि नागपुरात दोन सेंटरचा समावेश आहे. यामध्ये ३००पेक्षा जास्त मोठे सराफा आहेत. त्यांच्याकडे जुन्या दागिन्यांचा भरपूर स्टॉक असल्यामुळे केवळ तीन सेंटरमध्ये जुन्या दागिन्यांवर हॉलमार्क ३१ ऑगस्टपर्यंत होणार नाही. ३१ ऑगस्टनंतर हॉलमार्क नसलेले दागिने दुकानात आढळून आल्यास सराफांना दंड आणि शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे तारीख वाढविणे आवश्यक आहे.
एआयजेजीएफचे पदाधिकारी म्हणाले, दागिन्यांवर हॉलमार्क प्रथम बिंदू अर्थात दागिन्यांची निर्मिती होतानाच लावणे आवश्यक आहे. त्यामुळे देशात कोणतेही दागिने हॉलमार्कविना विकणार नाहीत. सरकारने अनिवार्य केल्यानंतर हॉलमार्क असलेले दागिने विकण्यास देशातील सराफा इच्छुुक आहेत. पण कमी कालावधीत हॉलमार्कची नोंद मिळविणे शक्य नाही. त्यामुळे एआयजेजीएफने तारीख वाढविण्याची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी केली आहे.