दुर्मिळ वृक्षांचे लाईव्ह संग्रहालय : विद्यार्थ्यांसाठी संशोधनाच्या संधीनागपूर : आज शहरी लोकांचे दैनंदिन आयुष्य अतिशय व्यस्त झाले आहे. सकाळी उठल्यापासून त्यांच्यावर कामाचा ताण असतो. त्यासाठी प्रत्येकजण दिवसभर धावत असतो. यात अनेकदा त्याला श्वास घेण्याचीसुद्धा सवड मिळत नाही. या धावपळीच्या जीवनामुळे शहरी लोकांच्या आरोग्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत उपराजधानीतील लोकांसाठी शहरातच हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालून आयुष्य वाढविणारी ‘बाग’ अॅग्रिकोज वेल्फेअर फोरमच्या माध्यमातून गोरेवाडा परिसरात विकसित करण्यात आली आहे.‘अॅग्रिकोज वेल्फेअर फोरम’ ही वेगवेगळ््या विभागातील उच्चपदांवरू न सेवानिवृत्त झालेल्या कृषी पदवीधरांची संस्था आहे. याच संस्थेचे पदाधिकारी असलेले गंगाप्रसाद ग्वालबंशी यांनी गोरेवाडा जंगलाशेजारी असलेली त्यांच्या मालकीची चार एकरमधील ‘बाग’ ‘अॅग्रिकोज’ फोरमला भेट दिली आहे. विशेष म्हणजे, ग्वालबंशी यांनी आपल्या चार वर्षांच्या परिश्रमातून ही बाग फुलविली आहे. या बागेत ५० पेक्षा अधिक फळझाडांसह औषधी वनस्पतींचा समावेश आहे. उपराजधानीच्या हद्दीत एकाच ठिकाणी विविध प्रकारची एवढी मोठी झाडे असलेली ही एकमेव ‘बाग’ आहे. त्यामुळे ही बाग आयुष्य वाढविणारी तर आहेच, शिवाय संशोधनाच्या दृष्टीनेही ती महत्त्वपूर्ण ठरत आहे. आजच्या आधुनिक युगात नवीन पिढी वृक्षाच्या माहितीपासून दुरावत चालली आहे. त्यामुळे एखादा कृषी पदवीधरसुद्धा दहा-वीस दुर्मिळ वृक्षांची माहिती सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत ही बाग विद्यार्थ्यांसाठी संशोधनाच्या दृष्टीने ‘दुर्मिळ वृक्षांचे लाईव्ह संग्रहालय’ ठरत आहे. त्यामुळेच येथे रोज शहरातील विविध शाळा-महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी व शिक्षक भेटी देत आहेत. (प्रतिनिधी)
एक ‘बाग’ आयुष्य वाढविणारी
By admin | Published: October 19, 2015 3:13 AM