मनपातील भाड्याच्या वाहनांचा प्रस्ताव : स्थायी समितीची प्रस्तावाला मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नियम धाब्यावर बसवून निविदा न काढता कामाला मुदतवाढ देण्याची प्रथा महापालिकेत दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत असाच प्रकार पुन्हा घडला. मनपातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या दबावात भाड्याच्या वाहनांसाठी नवीन निविदा न काढता जुन्या वाहनांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली.
१४ जानेवारी २०१९ रोजी स्थायी समितीने दोन वर्षासाठी खासगी वाहने भाड्याने घेण्याला मंजुरी दिली होती. परंतु यात मोठ्या प्रमाणात अनियमितता होती. ज्या दराने निविदा दाखल केल्या होत्या, त्याच दराने वाहन मालकांना काम देण्यात आले होते. वास्तविक नियमानुसार वाटाघाटी करून सर्वात कमी दराच्या निविदा मंजूर करणे अपेक्षित होते. २२,७०० ते २८ हजार रुपये भाड्याने वाहने घेण्यात आली होती. एका नेत्याच्या निकटवर्तीयांची ३५ ते ४० वाहने असल्याची चर्चा आहे. या नेत्याच्या दबावात कोविडचे कारण पुढे करून निविदा न काढता जुन्या वाहनांना मुदतवाढ देण्यात आली. संबंधित नेता ज्येष्ठ नगरसेवक असल्याने मनपात कोणताही प्रस्ताव मंजूर करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते.
कोविड संक्रमणामुळे मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी दिली. तसेच पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत नवीन निविदा मागविल्या असत्या तर अधिक दर आले असते. वेगवेगळ्या भाड्याने वाहने असल्याबाबतच्या प्रश्नावर त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.
राज्य सरकारचा अध्यादेश व वर्ष २०१७ स्थायी समितीने दिलेल्या शिफारशी विचारात घेता सुरक्षा रक्षक नियुक्तीचा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला.
...........
सोनेगाव तलावाचे सौंदर्यीकरण होणार
सोनेगाव तलावाचे सौंदर्यीकरण करण्याच्या प्रस्तावाला नगर विकास विभागाने २८ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रशासकीय मंजुरी दिली होती. त्यानुसार या कामासाठी मनपाला १७.३२ कोटींचा निधी दिला होता. या कामाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. कमी दरात १६.३० कोटी मध्ये काम करण्याची तयारी मे.एस.एस.पाटील अॅन्ड कंपनीने दर्शविली आहे. त्यानुसार स्थायी समितीने १३.०६ कोटीच्या खर्चाला मंजुरी दिली.