नागपूर : नागपूरच्या आमदार निवासाचा विस्तार करण्यासंदर्भात आघाडी सरकारच्या काळात दोन वेळा पाठविलेले प्रस्ताव मंजूर न झाल्याने विस्तारीकरण थांबले आहे. नवीन सरकार यावर काय निर्णय घेते याकडे आमदारांचे लक्ष असणार आहे.मुंबईच्या ‘मनोरा’च्या धर्तीवर नागपूरच्या आमदार निवासाचाही विकास व्हावा, अशी इच्छा आमदारांनी व्यक्त केल्यावर आणि यासंदर्भात सभागृहात चर्चा झाल्यावर २०११-२०१२ या वर्षात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना इमारत बांधकाम आणि विस्तार याबाबतचे प्रस्ताव पाठविण्यास सांगितले होते.सुरुवातीला बांधकाम विभागाने ५७ कोटींचा प्रस्ताव सादर केला होता व यात तीनही इमारतींची दुरुस्ती आणि विस्तार याचा समावेश होता. मात्र शासनाकडे निधी नाही त्यामुळे टप्प्याटप्प्याने विकास करू असे सांगून तत्कालीन मंत्र्यांनी फक्त एकाच इमारतीच्या विस्ताराचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. त्यानुसार पुन्हा २७ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला. पण तोही प्रस्ताव गत तीन वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहे. निधी नसल्याने आमदार निवासाची आवश्यक तेवढीच देखभाल दुरुस्ती केली जात आहे. गत वर्षी केलेल्या कामाचे देयकही अद्याप कंत्राटदारांना चुकते करण्यात आले नाही, हे येथे उल्लेखनीय. (प्रतिनिधी)
आमदार निवासाचा विस्तार अडला
By admin | Published: November 29, 2014 3:01 AM