नागपूर : शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के जागा आरक्षित करण्यासाठी शाळांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी अंतिम मुदत १० फेब्रुवारी होती. मात्र अनेक शाळांमध्ये पुरेशी नोंदणी न झाल्याने ही मुदत आता १५ तारखेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तथापि, या प्रक्रियेत नोंदणीसाठी अनेक शाळा पुढे न येऊनही प्रशासनाने शाळांवर कारवाई करण्यासाठी कोणतीही पावले उचललेली नाहीत. यावरून प्रशासनाची उदासीनता कायम दिसत आहे.
प्राप्त माहितीनुसार, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या ऑनलाइन पोर्टलवर १० तारखेपर्यंत झालेल्या ऑनलाइन नोंदणीचा आकडा ३४४ होता. मात्र प्रशासनाचे अवधी वाढविल्यावर तो ३६७ वर पोहोचला. हा आकडा मागील वर्षीच्या तुलनेत बराच कमी आहे. आतापर्यंत आरटीईच्या कोट्यातून जिल्ह्यात ३,२६५ जागा आरक्षित झाल्या आहेत. या प्रक्रियेत शाळांची गती धिमी असल्याने पालकांची ऑनलाइन अर्ज प्रक्रियाही अडकली आहे. प्रत्यक्षात ही प्रक्रिया आतापर्यंत सुरू व्हायला हवी होती, असे पालकांचे म्हणणे आहे.