नागपूर: कोरोनाच्या निर्बंधामुळे निर्माण झालेल्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नागपूर सुधार प्रन्यासने याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून भूखंडधारकांना दिलासा देण्यासाठी सर्व भूभाटकाची देय मुदत आता ३१ ऑगस्ट २१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे भूखंडधारकांना दिलासा मिळणार आहे.
कोविड-१९ विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर नागपूर सुधार प्रन्यास येथे केवळ २५ टक्के अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालयीन कामकाज केले जात होते, यामुळे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे भूभाटकाचे (ग्राउंड डिमांड रेंट) मागणीपत्र काढण्यासाठी व ते संबंधित भूखंडधारकांना पाठविण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता होती. याची दखल घेत ही सवलत देण्यात आली आहे.
दिलेल्या मुदतीत सर्व भूखंडधारकांनी त्यांच्या भूभाटकाची रक्कम जमा करावी, याबाबत १ जून मध्ये दर्शविलेली रक्कम भूखंडधारकाकडून, गाळेधारकाकडून ३१ ऑगस्ट २१ पर्यंत स्वीकारण्यात यावी. याबाबत संबंधित सर्व युनियन बँकेच्या सर्व शाखांना पत्र देण्यात आलेले आहे. ज्या भूखंडधारकांना मागणीपत्र प्राप्त झाले असतील त्यांनी नासुप्रच्या संबंधित विभागाकडून सुधारित मागणीपत्र प्राप्त करून घ्यावे, सदर मुदतीत भूभाटकाच्या रकमेवर व्याज आकारले जाणार नाही, असे आवाहन नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.