नागपूर : राज्यात चार वर्षांपूर्वी सिंगल युज प्लास्टिकचा वापरावर बंदी घातली आहे. असे असतानाही केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाद्वारे जारी अधिसूचनेनुसार नागपूर शहरात १ जुलैपासून सिंगल युज प्लास्टिकचे उत्पादन, साठवणूक, वापर, वाहतूक व विक्रीवर नव्याने व्यापक कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशाविषयी सर्वसामान्य नागरिक व दुकानदार अनभिज्ञ आहेत.
राज्य सरकारने ज्या प्लास्टिक उत्पादनावर बंदी घातली आहे, त्याविषयी नागरिकांना जाणीव आहे. दुसरीकडे औपचारिकता म्हणून मंगळवारी झोन स्तरावर रॅली काढून प्रतिबंधित सिंगल युज प्लास्टिक वस्तू मनपाकडे सुपूर्द करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. नवीन निर्बंधामुळे दुकानदारांसोबतच हॉटेल, बीअर बार, शॉपिंग मॉल, मंगल कार्यालये, आदींच्या अडचणी वाढणार असल्याने कारवाईला विरोध होऊ शकतो.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केंद्रीय अधिसूचनेसंदर्भात मार्च महिन्यात एक नोटीस जारी करून नागरिकांना सतर्क केले होते. केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या १२ ऑगस्ट २०२१ च्या अधिसूचनेनुसार १ जुलै २०२२ पासून सिंगल युज प्लास्टिकचा वापरावर बंदी घातली आहे. त्यात प्रतिबंधित प्लास्टिक उत्पादनाच्या श्रेणीचा उल्लेख करून राज्य सरकारच्या अधिसूचनेचाही उल्लेख करण्यात आला आहे.
प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारी मनपाच्या उपद्रव शोध पथकावर सोपविण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार मंगळवारी दहाही झोनमधील पथकांनी रॅली काढून, बाजारपेठांमध्ये फिरून नागरिकांना, व्यापारी बांधवांना, दुकानदारांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन केले.
हे आहेत प्रतिबंधित
-सजावटीसाठीचे प्लास्टिक व पॉलिस्टीरिन (थर्माकोल), मिठाईचे बॉक्स, निमंत्रण पत्रिका, सिगारेटची पाकिटे, प्लास्टिकच्या कांड्यांसह कानकोरणी, फुग्यांना लावण्यात येणाऱ्या प्लास्टिक कांड्या, प्लास्टिकचे झेंडे.
- आईस्क्रीम कांड्या, प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी - जसे काटे चमचे, चाकू, स्ट्रॉ, ट्रे. १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरी बॅग, पीव्हीसी बॅनर.
- सर्व प्रकारच्या प्लास्टिक बॅग हॅंडल व विना हॅंडल बॅग, कचरा व नर्सरीसाठी उपयोगात येणाऱ्या पिशव्या यातून वगळण्यात आलेल्या आहेत.
- सर्व कम्पोस्टेबल प्लास्टिक, पकड असलेल्या व नसलेल्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग), डिश बाउल, कंटेनर (डबे), आदींना प्रतिबंधित करण्यात आले आहे.
दंडात्मक कारवाई करणार
प्रतिबंधित प्लास्टिकसंदर्भात येत्या १ जुलैपासून मनपाच्या उपद्रव शोध पथकामार्फत बाजारपेठ, दुकाने, आस्थापनांमध्ये तपासणीची धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र विघटनशील कचरा नियंत्रण कायदा २००६ अंतर्गत महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना २०१८चे उल्लंघन केल्याप्रकरणी नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.