लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत. अपघात होण्याचा धोका वाढला आहे. शहराच्या सर्वच भागातील डांबरी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवले जातील अशी अपेक्षा होती. परंतु पावसामुळे खड्डे बुजवण्याचे काम ठप्पच होते. शुक्रवारी महापालिकेच्या विशेष सभेला सुुरुवात होताच विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी शहरातील खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला. यावर महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाला खड्डे त्वरित बुजवण्याचे निर्देश दिले. महापौरांनी विषय पत्रिकेवरील चार विषयांना मंजुरी देत अवघ्या १० मिनिटात सभा आटोपली.रस्त्यांवरील खड्ड्यासंदर्भात वृत्तांची दखल घेत उच्च न्यायालयाने स्वत: जनहित याचिका दाखल करून घेतल्याने महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, नासुप्र, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक व महामेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या महाव्यवस्थापकांना रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. महापौरांनी निर्देश दिल्याने आतातरी खड्डे तातडीने बुजवले जातील अशी शहरातील नागरिकांना अपेक्षा आहे.समाजकल्याण विभागाने सोनेगाव येथील बंद असलेली सहकारनगर प्राथमिक शाळा विरंगुळा केंद्र वा वृद्धाश्रमसाठी जागा देण्याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव विभागाला परत करण्याची सूचना संदीप जोशी यांनी केली. भांडेवाडी येथील कचरा जबलपूरला वीज निर्मितीसाठी नेण्याला मेसर्स एस्सेल इन्फ्राप्रोजेक्टच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी सर्वसाधारण सभा न घेता विशेष सभा घेण्यावर आक्षेप घेतला. सर्वसाधारण सभा घेतली असती तर नगरसेवकांना समस्या मांडता आल्या असत्या. वर्षभरात एकच सर्वसाधारण सभा घेतल्याचा आरोप त्यांनी केला. यावर सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी निगम सचिव यांना दोन दिवसात गुडधे यांना माहिती देण्याची सूचना केली. वर्षभरात तीन सर्वसाधारण तर सहा विशेष सभा घेण्यात आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. मात्र एकाच सर्वसाधारण सभेचे कामकाज झाले.न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील वाहतूक कोंडी संपुष्टात आणण्यासाठी विस्तृत पार्किग व्यवस्थापन आराखडा हैद्राबाद येथील मे.यू.एम.टी.सी. कंपनीने तयार केला आहे. याचे सभागृहात सादरीकरण करण्याची सूचना संदीप जोशी यांनी केली. सादरीकरणानंतरच प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार आहे. परंतु सभागृहात ७० नगरसेवक उपस्थित असल्याने महापौरांनी पुढील सर्वसाधारण सभेत हा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात यावा, असे निर्देश दिले.दुर्बल घटक समितीवर तीन सदस्यांची निवडमहापालिकेतील मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजनावरील खर्च योग्यप्रकारे होतो की नाही याकडे लक्ष वेधण्यासाठी मागासवर्गीय नगरसेवकांची ११ सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. यात भाजपाच्या आठ सदस्यांची निवड आधीच करण्यात आली आहे. शुक्रवारी सभागृहात काँग्रेस नगरसेवक आयशा उईके व नेहा राकेश निकोसे यांची तर बसपाचे नरेंद्र वालदे यांनी निवड करण्यात आली.