नागपूर : वकिली पेशाला काळिमा फासणारी घटना शहरात घडली असून एका महिला वकिलाला चक्क खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागात कार्यरत असल्याचे सांगून संबंधित महिला वकिलाने सहकाऱ्याच्या मदतीने एका बांधकाम व्यावसायिकाला ५ लाखांची खंडणी मागितली. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एक लाख रुपये घेत असताना महिला वकिलाला अटक केली. नसरिन हैदरी (कामठी) आणि संजय शर्मा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
रमेश आसूदानी (६९, जरिपटका) यांची टीव्ही टॉवरजवळ पशुवैद्यकिय महाविद्यालयाच्या मागे निर्माण ग्रेस नावाने कंस्ट्रक्शन साईट सुरू आहे. गेल्या आठवड्यात हैदरी व शर्मा यांनी आसूदानी यांच्या बांधकामाच्या ठिकाणी जाऊन छायाचित्र काढले. त्यानंतर आसूदानी यांच्या मुलाला फोन करून बांधकाम अवैध असल्याच्या तक्रारी असल्याचे सांगितले. बांधकामाच्या परवानगी व्यवस्थित घेतल्या नाहीत तसेच महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकारी नसरीन हैदरी यांना दोन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जर तक्रार दाबायची असेल तर माझी माणूस संजय शर्मा तुमच्याशी बोलेल, असे हैदरीने आसूदानी यांना सांगितले. त्यानंतर ती आणि संजय शर्मा दोघेही जरीपटक्यातील आसूदानी यांच्या कार्यालयात गेले. त्यांनी बांधकामाची परवानगी देण्याच्या नावावर आणि तक्रारींची फाईल बंद करण्यासाठी ५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास बांधकाम बंद पाडण्याची धमकी दिली. आसूदानी यांना शंका आल्याने त्यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्याकडे तक्रार केली. सुदर्शन तक्रारीची शहानिशा करून सापळा कारवाई करण्याचे आदेश दिले.
दुसरीकडे आसूदानी यांनी नसरीन हैदर आणि संजय शर्मा यांना खंडणी देण्याची तयारी दर्शविली. जैस्वाल हॉटेलजवळ खंडणी विरोधी पथकातर्फे सापळा रचण्यात आला. आसूदानी यांच्याकडून एक लाख रुपये स्वीकारताच दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींविरोधात यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख शारीन दुर्गे, ईश्वर जगदाळे, चेतन जाधव, सुधीर सौंदरकर, नितीन वासने, अनिल बोटरे आणि पूनम शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.