दयानंद पाईकराव
नागपूर : २१ दिवस घराच्या बाहेर राहायचे. मुलांची आठवण आली, तरी मन मारायचे. ट्रॅक मशीनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना २१ दिवसांनंतर ७ दिवसांची विश्रांती द्यावी, असा रेल्वे बोर्डाचा नियम आहे, परंतु मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात याचे पालन होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास होत आहे.
रेल्वे रुळांची देखभाल करणे गरजेचे आहे. त्यासाठी रेल्वेत ट्रॅक मशीन उपलब्ध आहेत. या मशीनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना २१ दिवस सातत्याने काम करावे लागते. त्यानंतर, त्या कर्मचाऱ्यांना ७ दिवस विश्रांती म्हणजे सुट्टी द्यावी, असा रेल्वे बोर्डाचा नियम आहे. दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात या नियमाचे पालन करण्यात येत आहे, परंतु मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात रेल्वे बोर्डाच्या नियमाचे पालन करण्यात येत नसल्यामुळे कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ट्रॅक मशीनवर काम करणारे १७०च्या वर कर्मचारी आहेत. २१ दिवस काम केल्यानंतर त्यांना आठवड्यातून १ दिवस त्यांना सुट्टी मिळत आहे, परंतु नागपूरपासून दूर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मशीनवर काम करून एका दिवसात घरी पोहोचणे शक्य होत नसल्यामुळे ते ट्रॅक मशीनच्या गाडीतच बसून राहत आहेत. रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार, २१ दिवस काम केल्यानंतर त्यांना ७ दिवसांची विश्रांती मिळत नाही. यामुळे कुटुंबापासून दूर राहिल्यानंतर मुलाबाळांसोबत राहण्याची इच्छा असलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. आम्ही ट्रॅक मशीनवर असलेल्या कर्मचाऱ्यांना आठवडी रजा देत आहोत, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे, परंतु रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार त्यांना ७ दिवसांची विश्रांती देण्याची मागणी ट्रॅक मशीन हाताळणारे कर्मचारी करीत आहेत.
..............
रेल्वे बोर्डाच्या नियमाचे पालन करावे
‘ट्रॅक मशीन हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना २१ दिवस काम केल्यानंतर ७ दिवसांची विश्रांती द्यावी, असा रेल्वे बोर्डाचा नियम आहे, परंतु मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात या नियमाचे पालन होत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून, रेल्वे बोर्डाच्या नियमाचे पालन व्हावे, अशी संघटनेची मागणी आहे.’
-विकास गौर, महासचिव, स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी युनियन
असोसिएशनच्या निर्णयानुसार निर्णय
‘सहा दिवस काम केल्यानंतर ट्रॅक मशीनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवडी रजा देण्यात यावी, ही ट्रॅक मशीन असोसिएशनची मागणी आहे. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस रजा देण्यात येत आहे.’
-एस. जी. राव. जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
................