नागपूर : कंत्राट देण्याच्या नावाखाली छत्तीसगड येथील एका व्यक्तीने नागपुरातील कंत्राटदाराला १४ लाखांचा गंडा घातला. बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
बजेंद्र मोहन अमरेश (वय ४६, वृंदावन कॉलनी, भगवनापूर, रायगढ) असे आरोपीचे नाव आहे. किशोर सोमकुवर (५४, सुभेदार ले आऊट) यांची त्यांच्या मित्राने बजेंद्रसोबत ओळख करून दिली होती. किशोर हे इलेक्ट्रिकचे कंत्राटदार असून, बजेंद्रने तोदेखील कंत्राटदार असल्याची बतावणी केली. वडसा ते वणीदरम्यान इलेक्ट्रिक पोलची लाईन टाकण्याचे कंत्राट मिळाले असून, महाराष्ट्रातील गुंतवणूकदाराची आवश्यकता असल्याचे बजेंद्रने सांगितले. मिळणाऱ्या नफ्यातून ५० टक्के नफा देण्याचे आमिष त्याने किशोर यांना दाखविले.
आठ रस्ता चौकातील एका हॉटेलमध्ये ही चर्चा झाली. किशोर यांना त्याच्यावर विश्वास बसला व भागीदारीबाबत बजेंद्रसोबत लेखी करारनामादेखील तयार केला. त्यांनी त्याला १४ ऑक्टोबर २०१८ ते २८ जानेवारी २०१९ दरम्यान १५ लाख रुपये दिले. मात्र, त्यानंतर बजेंद्र टाळाटाळ करू लागला. त्याने किशोर यांना कामाची साईटदेखील दाखविली नाही. किशोर यांनी वारंवार विचारणा केल्यानंतर त्याने त्यांना ९० हजार रुपये परत केले. मात्र, उर्वरित १४ लाख १० हजार परत केलेच नाही. त्याने त्यांचे फोनदेखील उचलणे बंद केले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर किशोर यांनी बजाजनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.