योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरोग्य विबागात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली एका शिक्षकाला व त्याच्या नातेवाईकांना एका आरोपीने १८ लाखांचा गंडा घातला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून आरोपी फरार झाला आहे.
नंदकिशोर रेवतकर (३९, श्रीकृष्णनगर) यांनी या प्रकरणात तक्रार केली आहे. त्यांची जानेवारी २०२० मध्ये दीपक श्रावण शेंद्रे (४९, रुक्मिणीनगगर, नवीन सुभेदार ले आऊट) याच्यासोबत ओळख झाली. दीपकने नंदकिशोर यांच्यासमोर मोठमोठ्या बाता केल्या. त्याने त्याची सरकारी कार्यालयात ओळखी असून तो नोकरी लावून देत असल्याची बतावणी केली.
नागपूर व गोंदिया येथे आरोग्य विभागात प्रत्येकी दोन जागा रिक्त असून १० लाख रुपयांत काम होईल असा दावा त्याने केला. त्याने पाच लाख रुपये ॲडव्हान्स लागतील असे देखील सांगितले. नंदकिशोर यांचा त्याच्यावर विश्वास बसला व नातेवाईकांना नोकरी लावून देण्याबाबत दीपकसोबत बोलणे केले. आरोपीने त्यांना १५ दिवसांत मुलाखत पत्र देतो असे सांगून १८ लाख रुपये घेतले. मात्र त्याने कुठलेही पत्र दिले नाही. नंदकिशोर यांनी चौकशी केली असता आरोग्य विभागात कुठलीही जागा नसून जाहीरातदेखील निघाली नसल्याचे कळाले. त्यांनी आरोपीला पैसे परत मागितले. त्याने कोरोनाचे कारण समोर करून टाळाटाळ केली. २८ फेब्रुवारी २०२३ रोजी त्याने नंदकिशोर यांना धनादेश दिले. मात्र ते वटलेच नाही. त्यानंतर आरोपी घर सोडून निघून गेला. तेव्हापासून तो फरारच आहे. नंदकिशोर यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून त्याचा शोध सुरू आहे.