लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात दररोज ६ ते ७ हजार कोराेनाबाधित आढळत आहेत. शहरात चार हजाराहून अधिक बाधितांची भर पडत आहे. संक्रमणाची चेन ब्रेक करण्यासाठी काॅन्टॅक्ट ट्रेसिंग वेळीच होणे गरजेचे आहे. यासाठी बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी होणे आवश्यक आहे. परंतु मागील तीन दिवस महापालिकेच्या केंद्रावर आरटीपीसीआर चाचण्या बंद होत्या. खासगी लॅबमध्ये चाचणीसाठी अवाच्या सवा शुल्क आकारले जात आहे. त्यात चाचणीचा रिपोर्ट मिळण्यास सहा ते आठ दिवसांचा कालावधी लागत असल्याने वेगाने वाढणाऱ्या संक्रमणाला आळा कसा बसणाार? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
खासगी रुग्णालयांत चाचणीसाठी शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी खासगी रुग्णालयांकडून लूट सुरू आहे. आरटीपीसीआर चाचणीसाठी ७५० रुपये घेणे अपेक्षित असताना ४ ते ५ हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. ॲन्टिजेन चाचणीचा अहवाल त्याचदिवशी मिळणे अपेक्षित आहे. परंतु यासाठीही दुसऱ्या दिवसाची प्रतीक्षा करावी लागते. आरटीपीसीआर चाचणीच्या रिपोर्टला ६ ते ८ दिवस लागत आहेत. या कालावधीत रुग्णावर उपचारही करता येत नाहीत. अशा परिस्थितीत रुग्ण गंभीर आजारी पडल्यास, कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, असा प्रश्न पडतो. याचा विचार करता, आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी मिळाल्यास संबंधित रुग्णावर उपचार करणे सोयीचे होईल. परंतु महापालिका प्रशासनही हतबल दिसत आहे.
.....
सुविधा निर्माण करण्याची गरज
संशयित रुग्णांनी चाचणी केल्यानंतर २४ तासात रिपोर्ट मिळावा, यासाठी प्रयोगशाळांची संख्या वाढविण्याची गरज आहे. शहरात दररोज २० हजाराहून अधिक चाचण्या होत आहेत. त्या प्रमाणात प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी प्रशासनाने युध्दपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु दुर्दैवाने असे दिसत नाही. वाढत्या रुग्णांपुढे प्रशासनही हतबल दिसत आहे.
...
गृह विलगीकरणातील रुग्ण वाऱ्यावर
गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४० हजारांच्या आसपास आहे. या रुग्णांची औषधासाठी भटकंती सुरू आहे. मनपा प्रशासनाकडून औषध पुरवठा केला जात नाही. त्यांची साधी विचारपूसही केली जात नाही. विलगीकरणातील रुग्ण औषधासाठी भटकंती करीत असल्याने यातूनही संक्रमणाचा धोका वाढला आहे. उपचार मिळत नसल्याने विलगीकरणातील अनेक रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.