माहितीचा अधिकार : वीज ग्राहकांना आर्थिक फटका नागपूर : सार्वजनिक क्षेत्रातील वीज वितरण कंपनी महावितरणतर्फे वीज ग्राहकांकडून दरवर्षी अतिरिक्त डिपॉझिटच्या नावाखाली कोट्यवधीची वसुली केल्या जाते. त्यानुसार मागील ३० एप्रिल २०१६ पर्यंत महावितरणने शहरातील ३५ हजार २७५ वीज ग्राहकांकडून १ कोटी ३२ लाख १३ हजार ५९९ रूपयांची अतिरिक्त ठेव वसुली केल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. विशेष म्हणजे, शहरातील आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना स्वत: महावितरणने माहितीच्या अधिकारात ही माहिती उपलब्ध करून दिली आहे. महावितरणच्या मते, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या अधिनियम २००५ मधील कलम ४७ च्या उपकलम (५) आणि उपकलम (१) अन्वये सर्व वर्गवारीतील लागू असलेल्या वीज ग्राहकांना वितरण कंपनीकडे अतिरिक्त सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. वीज वितरण कंपनी ही वर्षांतून एकदा १२ महिन्यातील वीज वापराच्या सरासरीनुसार सुरक्षा ठेवीचे पुननिर्धारण करते. वीज वितरण कंपनी ही सुरुवातीला वीज पुरवठा देताना सुद्धा ग्राहकांकडून सुरक्षा ठेव जमा करून घेते. मात्र ग्राहकाचा वीज वापर हा दरवर्षी वाढत असतो, त्यामुळे १२ महिन्यातील विजेचा सरासरी वापर व सुरक्षा ठेव यातील तफावत दूर करण्यासाठी ही अतिरिक्त सुरक्षा ठेव वसूल केल्या जात असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. शिवाय या अतिरिक्त ठेवीचा उपयोग हा मुख्य कार्यालयाकडून केला जातो. असेही सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
१ कोटी ३२ लाखांची अतिरिक्त ठेव वसुली
By admin | Published: June 15, 2016 3:09 AM