नितीन नागपुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परतीच्या पावसामुळे सोयाबीन व कपाशीचे मोठे नुकसान झाले. याच पावसाचा फटका काटोल व नरखेड तालुक्यातील संत्रा व मोसंबीलाही बसला आहे. पावसामुळे अंबिया व मृगबहाराची संत्री तसेच मोसंबी मोठ्या प्रमाणात गळाली आहे. विशेष म्हणजे, नरखेड तालुक्यातील जलालखेडा, खैरगाव, मोवाड, मेंढला, थडीपवनी, लोहारीसावंगा, भिष्णूर या भागात पावसामुळे खरीप पिकांसोबत संत्रा व मोसंबीचे प्रचंड नुकसान होऊनही शासनाने अद्याप नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण किंवा पंचनामे केले नाहीत. त्यामुळे प्रशासन या बाबी करणार कधी, असा प्रश्नही नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.या पावसामुळे तसेच दमट वातावरणामुळे भाजीपाल्यांच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात महेंद्री (ता. नरखेड) येथील शेतकरी नारायण नाखले यांनी सांगितले की, त्यांची १.८९ हेक्टरमध्ये संत्रा व मोसंबीची बाग आहे. त्यात संत्र्याची २०० आणि मोसंबीची १०० झाडे आहेत. यावर्षी त्यांच्या बगीच्यात अंबिया व मृग या दोन्ही बहाराची संत्री असून, मोसंबीलाही चांगली फलधारणा आहे. नुकत्याच कोसळलेला परतीचा पाऊस व वादळामुळे दोन्ही बहाराची संत्री तसेच मोसंबी गळायला सुरुवात झाली आहे. दोन्ही बागांमधील अर्ध्यापेक्षा अधिक फळे गळाल्याचे नारायण नाखले यांनी सांगितले.हीच अवस्था संपूर्ण नरखेड व काटोल तालुक्यातील संत्रा व मोसंबीच्या बागांची आहे. यासंदर्भात आपण कृषी व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना माहिती दिली. मात्र, कुणीही अद्याप शेतात येऊन पाहणी अथवा नुकसानीचा पंचनामा केला नाही, अशी माहिती नाखले यांनी दिली असून, त्याला इतर गावांमधील शेतकऱ्यांनी दुजोरा दिला आहे. खरीप पिकांसोबतच भाजीपाल्याची संपूर्ण पिके खराब झाल्याची माहिती अनेकांनी दिली.यावर उपाय म्हणून शासनाने नुकसानग्रस्त खरीप व भाजीपाल्यांच्या पिकांची तसेच संत्रा व मोसंबी बागांचे सर्वेक्षण करावे, पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई तातडीने जाहीर करून ती अदा करावी, अशी मागणीही नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. या तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचा तसेच संत्रा व मोसंबीचा विमा काढला आहे. त्यांना विमा कंपनीकडून योग्य परतावा मिळवून द्यावा, अशी मागणीही पीक विमाधारक शेतकऱ्यांनी केली आहे.
‘अॅन्ड्राईड’ फोन आणायचा कुठून?परतीच्या पावसामुळे संपूर्ण पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसानीचे फोटो काढून ते पुरावे म्हणून सादर करावे, असे प्रशासनाने फर्मान काढल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली. सततची नापिकी, शेतमालाला बाजारात मिळणारा कमी भाव आणि त्यातून वाढत जाणारे कर्जबाजारीपण यामुळे जीवन जगणे मुश्कील झाले आहे. जीवनावश्यक गरजा व शेतीचा खर्च भागविणे कठीण असताना नुकसानीचे फोटो काढण्यासाठी ‘अॅन्ड्राईड’ फोन खरेदी करण्यासाठी पैसा आणायचा कुठून, असा प्रश्नही अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
पीककर्जाची समस्याबहुतांश शेतकऱ्यांची भिस्त ही कपाशी व सोयाबीनच्या पिकांवर असून, काही शेतकरी संत्रा व मोसंबी उत्पादक आहेत. यातील अनेकांनी याही वर्षी बँकांकडून पीककर्ज घेतले आहे. आॅगस्ट, सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे पिकांची अवस्था खराब झाली होती. त्यातच परतीच्या पावसाने दणका दिला. कपाशी, सोयाबीन, संत्रा, मोसंबी व भाजीपाल्याची पिके हातीची गेल्याने तसेच जी पिके हाती आली त्यांची प्रतवारी खराब असल्याने त्यांना बाजारात भाव मिळणार नाही. त्यामुळे यावर्षी पीककर्जाची परतफेड करायची कशी, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.