मेहा शर्मा
नागपूर : क्लायमेट चेंज (हवामान बदल) किती धाेकादायक ठरू शकते याचे संकेत देणारी आकडेवारी भारतीय हवामान विभागाने सादर केली आहे. हवामान बदलामुळे मागील वर्षी केवळ राज्यात ३५० नागरिकांचे बळी गेले. संपूर्ण देशात यामुळे १७५० लाेकांनी जीव गमावला. सर्वाधिक ७८७ मृत्यू वीज पडल्याने झाले आहेत. त्यापाठाेपाठ पूर, अतिवृष्टी व दरड काेसळण्याचे प्रमाण असून यामुळे ७५९ नागरिकांचा बळी घेतला. याशिवाय चक्रीवादळाने १७२ तर थंडीची लाट व धुळीच्या वादळाने ३२ जण दगावले.
भारती इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पाॅलिसी, इंडियन स्कूल ऑफ बिजनेसचे सहायक प्राध्यापक व संशाेधन संचालक अंजल प्रकाश यांनी सांगितले, हवामान बदलावरील आंतर शासकीय पॅनलचा नुकताच आलेला अहवाल आणि त्यांच्या क्लायमेट माॅडेलवरून ग्लाेबल वार्मिंगचे माेठे परिणाम नागरिकांना सहन करावे लागत आहेत. हिमनद्यांचे बर्फ वितळण्यास आणि चक्रीवादळात हाेणाऱ्या वाढीसाठी हवामान बदल कारणीभूत आहे. महाराष्ट्रात अनेक परिसंस्था आहेत. यामध्ये वनक्षेत्र, मोठ्या किनारपट्ट्या तसेच अर्ध-शुष्क प्रदेशही आहे. त्यामुळे बदलत्या हवामानासाठी ते सर्वांत असुरक्षित आहे. अलीकडच्या घटनांवरून महाराष्ट्रातील लाेक हवामानाच्या जोखमींशी संपर्कात असल्याचे लक्षात येते.
हवामान बदलाची जागृती शासकीय प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उचललेले पाऊल काैतुकास्पद आहे. मात्र, यासाेबत कृती करणे आणि जिल्हा स्तरावर नियाेजन करण्याची गरज आहे, ज्यामुळे क्लायमेट माॅडेल लाेकांच्या लक्षात येईल. त्यानुसार वैज्ञानिक संस्थांनी शासनासाेबत काम करून हवामानाचा डेटा जिल्हा स्तरापर्यंत पाेहोचविण्यास मदत करावी. या माहितीद्वारे जिल्हा स्तरावर याेजना आखून त्याची अंमलबजावणी करणे साेपे हाेईल. विकासाची प्रक्रिया हवामानाचा धाेका लक्षात घेऊन चालावी आणि प्रत्येक कृती पर्यावरणाचा विचार करून व्हावी, अशी भावना अंजल प्रकाश यांनी व्यक्त केली.
सेंटर फाॅर रिसर्च ऑन क्लिन एअर (सीआरईए) चे विश्लेषक सुनील दहिया म्हणाले, इंधनाच्या अमर्याद वापरामुळे स्थानिक वायू गुणवत्तेवर परिणाम हाेताे. त्यामुळे वातावरणाशी निगडित महापूर, दुष्काळ, चक्रीवादळ यासारख्या घटनांची तीव्रता आणि वारंवारता वाढत चालली आहे. या घटनांमध्ये मानवी आराेग्यासह प्रचंड आर्थिक नुकसानही सहन करावे लागते आहे. त्यामुळे इंधनाचा वापर कमी करणे आणि वायू प्रदूषण कमी करणे, हेच पर्याय हवामान बदल राेखण्यासाठी असल्याचे मत दहिया यांनी व्यक्त केले.
- तर भयावह संकटाचा सामना करावा लागेल
ग्रीन व्हिजिलचे काैस्तुभ चटर्जी यांनी मानवनिर्मित वायू प्रदूषण मुख्य समस्या असल्याचे सांगितले. तापमान वाढ, ग्लाेबल वार्मिंग आणि हवामान बदल त्याचेच परिणाम आहेत. आपण भयंकर आपत्तीकडे चाललाे आहाेत. संपूर्ण जग आज तापमान वाढ १.५ अंशावर मर्यादित ठेवण्यासाठी झगडत आहे. शंभर वर्षांत ते १.१ अंशाने वाढले आहे. हे केवळ एका देशाच्या प्रयत्नाने शक्य हाेणार नाही. वैश्विक तापमान २ अंशाने वाढले तर भयावह संकटाचा सामना करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.