लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणूक कालावधीत निवडणूक प्रक्रियेविषयी तपशीलवार माहिती व संदर्भासाठी माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्यावतीने तयार करण्यात आलेली ‘संदर्भ आणि दिशा’ माहिती पुस्तिका प्रसार माध्यम प्रतिनिधी आणि संबंधितांना अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.विभागीय आयुक्तांच्या दालनामध्ये गुरुवारी माहिती व जनसंपर्क संचालनालय, नागपूर- अमरावती विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेली ‘संदर्भ आणि दिशा’ माहिती पुस्तिकेचे लोकार्पण विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त सुधाकर तेलंग, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे उपस्थित होत्या.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात या महिन्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या मतदान प्रक्रियेच्या काळात माध्यम प्रतिनिधींना आणि संबंधितांना ‘संदर्भ आणि दिशा’ माहिती पुस्तिका अत्यंत उपयुक्त ठरेल. निवडणुकीच्या कालावधीत आचारसंहितेत काय करावे, काय करु नये , पेड न्यूज या विषयी देखील माहिती देण्यात आली असल्यामुळे ही माहिती पुस्तिका अत्यंत उपयुक्त असल्याचे डॉ. संजीव कुमार यांनी यावेळी सांगितले. तसेच ‘संदर्भ आणि दिशा’ माहिती पुस्तिकेच्या निमितीर्साठी त्यांनी माहिती व जनसंपर्क संचालनालय व चमूचे अभिनंदन केले.या माहिती पुस्तिकेमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची माहिती, वृत्तपत्रांसाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्त्वे, निवडणूक सर्वेक्षणासंदर्भात मार्गदर्शिका, पेड न्यूज निश्चित करण्याचे निकष, सोशल मीडियासंदर्भात निवडणूक आयोगाच्या सूचना, आदर्श आचारसंहिता, शासकीय वाहनांचा वापर, निधी अनुदान, प्रचार, माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती ,समाज माध्यमे, सी-व्हिजिल अॅप याबबत विस्ताराने माहिती दिली आहे.