नागपूर : कॅनडातून जुना मित्र बोलत असल्याचा बहाणा करत सायबर गुन्हेगाराने एका फॅब्रिकेशन व्यापाऱ्याची तब्बल १६ लाख रुपयांनी फसवणूक केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मनिंदरसिंग महेंद्रसिंग जब्बल (५२, पिवळी नदी परिसर) हे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतात. बग्गा सिंग नावाचा त्याचा मित्र कॅनडामध्ये राहतो. जब्बल बराच काळापासून बग्गा सिंगशी संपर्कात नव्हते. १६ नोव्हेंबर रोजी अज्ञात आरोपीने जब्बल यांना फोन करून बग्गा सिंग अशी ओळख दिली.
त्याने जब्बलला सांगितले की त्याच्या एका मित्राची आजी आजारी आहे. त्या मित्राला आजीच्या उपचारासाठी पैशांची नितांत गरज आहे. कथित बग्गा सिंगने जब्बलकडून त्याच्या बँक खात्याची माहिती घेतली. खात्यावर १८.५० लाख रुपये पाठवण्याचा मेसेज केला. ही रक्कम मित्राच्या खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले. जब्बल यांना त्यांच्या खात्यात साडेअठरा लाख रुपये जमा केल्याचा संदेश मिळाला नाही.
कथित बग्गा सिंग यानेच पैसे पाठवण्याचा मेसेज केला, खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे जब्बल यांनी सांगितल्यावर कथित बग्गा सिंग याने काही वेळाने सर्व्हर डाऊन असल्याचे सांगून एन्ट्री दाखविण्याचे नाटक केले. त्याने जब्बालला त्याच्या कथित मित्राचा खाते क्रमांक दिला आणि त्याच्याकडे १६ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. जब्बल यांनी पैसे पाठवले. यानंतर जब्बल यांना आपली फसवणूक झाल्याचा संशय आला. कथित बग्गा सिंग याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. जब्बल यांच्या तक्रारीवरून यशोधरा पोलिसांनी फसवणूक आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.