आॅनलाईन लोकमतराजेश निस्ताने । यवतमाळ : पावसाळा आठवडाभरावर येऊन ठेपला. परंतु अद्यापही रस्त्यांवरील खड्डे (पॅचेस) बुजविण्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. द्वि-वार्षिक देखभाल योजनेच्या नव्या पॅटर्नमुळे दुरुस्तीच्या कामांना तत्काळ सुरुवात होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात दरवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात खड्ड्यांचा सामना वाहनधारकांना करावा लागणार आहे. शासनाने आता द्वि-वार्षिक देखभाल दुरुस्ती योजना आणली आहे. या योजनेत एकाच कंत्राटदाराला अनेक किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याचे कंत्राट दोन वर्षांसाठी देण्याचे नियोजन आहे. या योजनेमुळे जुने ३१ मार्चचे कंत्राट शासनाच्या आदेशाने रद्द केले गेले. परंतु नवी योजना अद्यापही कार्यान्वित झाली नाही. वास्तविक देखभाल दुरुस्तीची जुनी पद्धत बंद करताना नवी पद्धत अगदी तयार असायला हवी होती. परंतु तसे न झाल्याने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविणार कोण ? याचा पेच बांधकाम खात्यात निर्माण झाला आहे.