लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पायाभूत सुविधांच्या विकासासोबत रस्ते, रेल्वे, मेट्रो उड्डाणपूल जागतिक दर्जाचे विमानतळ तसेच विविध शैक्षणिक सुविधांच्या विकासामुळे नागपूर शहर हे देशातील नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट शहर म्हणून विकसित होत असून गेल्या पाच वर्षात केलेल्या प्रचंड विकास कामांमुळे नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलतोय, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.लिबर्टी टॉकीज ते जुना काटोल नाका चौक व प्रादेशिक मानसिक रुग्णालय या दरम्यान असलेल्या सदर उड्डाणपुलाचे लोकार्पण शुकवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र्र फडणवीस, महापौर संदीप जोशी, खा. डॉ.विकास महात्मे, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.जोगेंद्र कवाडे, आ. प्रा.अनिल सोले, आ. गिरीश व्यास,आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी आमदार सुधाकर देशमुख उपस्थित होते.नितीन गडकरी यांनी यावेळी गेल्या पाच वर्षात केंद्र सरकार आणि मागच्या भाजपच्या राज्य सरकारने नागपूर व विदर्भात केलेल्या व सुरू असलेल्या विकास कामांचा पाढाच वाचून सांगितला. मागील पाच वर्षात तब्बल ७० ते ७५ हजार कोटी रुपयांची विकास कामे झाली अजूनही सुरू आहेत कामाची ही गती अशीच सुरू राहील. नागपूर शहर प्रदूषणमुक्त व अपघातमुक्त बनविण्याचा प्रयत्न असून यासाठी वाहतूक व दळणवळण यामध्ये आमूलाग्र बदल करण्यात येत आहे. शहरातील ५० हजार युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न असून, यासाठी माहिती व तंत्रज्ञान तसेच विविध क्षेत्रातील उद्योग येथे सुरु झाले आहेत. नागपूर मेट्रोचे काम लवकरच पूर्ण होईल, तसेच दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही सुरुवात होईल, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना राजकीय चिमटा काढला. ते म्हणाले. पूर्वी एखाद्या प्रकल्पाचे भूमिपूजन एक सरकार करायचे. त्यानंतर दोन-तीन सरकार झाल्यावर त्या प्रकल्पाचे उद्घाटन होत असे. परंतु नितीन गडकरी यांनी ज्या-ज्या कामांचे भूमिपूजन केले, त्याचे उद्घाटनही तेच करताहेत. त्यांच्यामुळेच आज नागपूर शहराचे चित्र पालटले आहे.प्रास्ताविक नरेश वडेट्टीवार यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. किशोर जिचकार यांनी आभार मानले.वाहतुकीची कोंडी सुटणारसदर ते मानकापूर आणि काटोल रोडला जोडणाºया ३.९८ किलोमिटर लांबीच्या उड्डाणपुलामुळे सदरयेथील वाहतुकीची मोठी कोंडी सुटणार आहे. हा उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग ४७ वर असून २४ महिन्याच्या कालावधीत पूर्ण झाला आहे. हा उड्डाण पूल लिबर्टी सिनेमा ते मानकापूर चौक तसेच लिबर्टी सिनेमा ते जुना काटोल नाका चौकापर्यंत असल्यामुळे या मार्गातील वाहतूक सुरळीत होणार आहे. यावर २१८.११ कोटी रूपये खर्च आला आहे.सिग्नल व्यवस्था आणखी मजबूत करणारगडकरी यांनी सांगितले की, त्यांनी या उड्डाणपुलाचे निरीक्षण केले. तव्हा या उड्डाणपुलावर रिजर्व्ह बँक चौकात उतरायच्या पॉइंटवर अघताची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तज्ज्ञांच्या सूचना मागवल्या जात असून त्यांच्यानुसार वाहतूक सिग्नल व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाईल.मेट्रो रेल्वेचा होणार विस्तारगडकरी यांनी सांगितले की, मेट्रो रेल्वेचा विस्तार आणखी वाढवून पारडीच्या पुढे आणि वर्धा रोडवर मिहानपुढे बुटीबोरीपर्यंत नेले जाईल. यासोबतच ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत रामटेक-बडनेरा, सावनेरसह नागभिड आणि इतर परिसरालाही जोडून पूर्व विदर्भाला जोडण्याची योजना आहे.पालकमंत्री- गृहमंत्री गैरहजरसदर उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या शासकीय निमंत्रण पत्रिकेमध्ये नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन मंत्री सुनी केदार यांच्यासह पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांचेही नाव होते. परंतु हे सर्व कार्यक्रमात गैरहजर होते, असे असले तरी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या पीआरपीचे अध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे मात्र उपस्थित होते.
नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलतोय : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:30 PM
नागपूर शहर हे देशातील नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट शहर म्हणून विकसित होत असून गेल्या पाच वर्षात केलेल्या प्रचंड विकास कामांमुळे नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलतोय, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
ठळक मुद्देसदर उड्डाण पुलाचे लोकार्पण, वाहतूक कोडींतून सुटका