वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता यंत्रणेद्वारे प्रवाशांचा चेहरा ओळखून प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे विविध ठिकाणी होणाऱ्या तपासणीच्या कटकटीपासून प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. याकरिता विमानतळावर बायोमेट्रिक आयडी मॅनेजमेंट यंत्रणा लावण्यात येणार आहे.
घरगुती उड्डाणांसाठी सुविधाया सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना आधार वा पासपोर्टच्या माध्यमातून आॅनलाईन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर विमानतळावरील यंत्रणेद्वारे चेहऱ्याचे स्कॅनिंग करून त्यांना दिलेल्या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून चेहरा आणि विवरणाची तपासणी होणार आहे. प्रवाशांची ओळख झाल्यानंतर ई-गेट अथवा सेल्फ बोर्डिंग गेट उघडणार आहे. तिकिटाचा पीएनआर व चेहºयाची ओळख झाल्यानंतर प्रवाशाला एक टोकन देण्यात येईल. पुढील तपासणीत वैयक्तिक ओळखीसाठी कागदपत्रे दाखविण्याची गरज भासणार नाही. नवीन प्रणालीमुळे प्रवाशांना मॅन्युअल तपासणीपासून सुटका मिळेल. सध्या ही सुविधा घरगुती उड्डाणांसाठी राहील. प्रवाशांना उड्डाणाच्या एक तासापूर्वी विमानतळावर जावे लागते. प्रारंभी आयडीसह तिकिटाची तपासणी करण्यात येते. त्यानंतर बॅगचे स्कॅनिंग, चेकइन आणि बोर्डिंग पास व टॅग मिळवावे लागते. पुढील टप्प्यात सुरक्षा यंत्रणेद्वारे तपासणी केल्यानंतर प्रवाशाला विमानात जाता येते. नवीन यंत्रणा बेंगळुरू आणि हैदराबाद विमानतळावर प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात आली असून हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
प्रवाशांना होणार फायदानवीन यंत्रणेमुळे प्रवाशांना बोर्डिंग पास व सिक्युरिटी तपासणीसाठी रांगेत राहावे लागणार नाही. नवीन व्यवस्थेमुळे विमानतळावरील गर्दी कमी होईल. आधुनिक पद्धतीने पेपरलेस काम होईल. एकदा नोंदणीनंतर प्रवाशाला नंतरच्या प्रवासावेळी ओळखपत्राची गरज भासणार नाही, शिवाय प्रवाशांची ओळख वेगाने होईल. या यंत्रणेमुळे विमान कंपन्या, विमानतळ आणि सुरक्षेत कार्यरत जवांनावरील बोझा कमी होईल.
कंत्राटदाराने अर्धवट कार्य सोडलेविमानतळावर बायोमेट्रिक आयडी मॅनेजमेंट सिस्टीम उभारणीचे काम कंत्राटदाराने तीन महिन्यांपूर्वी अर्धवट सोडले आहे. या संदर्भात विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांनी सांगितले की, हे काम पूर्ण केल्यानंतरच कंत्राटदारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यंत्रणा यशस्वीरीत्या सुरू झाल्यानंतर कामाचे पैसे देण्यात येईल. तीन महिन्यांपासून पुणे येथील कंपनीचे संचालक आलेले नाहीत.