लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यावसायिक महिलेशी प्रेमसंबंध आणि नंतर शरीरसंबंध प्रस्थापित करून फेसबुक फ्रेण्डने एका महिलेला ब्लॅकमेल केले. कधी बदनामीची तर कधी कशाची धमकी देऊन त्याने या महिलेकडून दीड वर्षात चक्क आठ लाख रुपये हडपले. त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यावरून गिट्टीखदान पोलिसांनी बुधवारी या प्रकरणात गुन्हा दाखल केला.कुमार आर. गवडी असे आरोपीचे नाव आहे. तो आदिलाबाद (तेलंगणा) जिल्ह्यातील मंचेरियलचा रहिवासी आहे. तक्रार करणारी महिला (वय ३६) मूळची तेलंगणामधीलच रहिवासी असून, २००२ मध्ये तिचे लग्न झाल्यानंतर ती नागपुरात राहायला आली. जुलै २०१७ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून आरोपी सोबत तिची ओळख झाली. गवडी माहेरचा असल्यामुळे ती त्याच्या लगेच जवळ गेली. दरम्यान, तिच्या पतीला हृदयविकाराचा झटका आल्याने ती पतीसोबत उपचारासाठी हैदराबादला गेली. २१ जुलै २०१७ ला आरोपी तेथे पोहचला. तोपर्यंत दोघांमधील मैत्री प्रेमसंबंधापर्यंत पोहचली होती. त्यामुळे या महिलेचे गवडीसोबत तेथे शरीरसंबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर ती नागपुरात परत आली असता आरोपीने तिला फोन करून हैदराबादमध्ये प्रस्थापित झालेल्या शरीरसंबधाचा व्हिडीओ आणि फोटो काढल्याचे सांगितले. हे सर्व सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी देऊन त्याने तिला त्याच्या बँक खात्यात १४ हजार रुपये जमा करायला सांगितले. त्यानंतर त्याने महिलेला वेळोवेळी कारणं सांगून स्वत:च्या, पत्नीच्या आणि मित्रांच्या खात्यातही रक्कम जमा करायला भाग पाडले. नोव्हेंबर २०१८ मध्ये तो नागपुरात आला आणि तब्बल दोन महिने महिलेच्या घरी मुक्कामी थांबला. या कालावधीत त्याने महिलेकडून एक लाख, पाच हजारांचे सोन्याचे दागिने घेतले. त्यानंतर तो हैदराबादला निघून गेला. तेथून तो वारंवार फोन करून तिला पैशाची मागणी करू लागला. शरीरसंबंधासाठीही तो तिला इकडेतिकडे येण्यास बाध्य करू लागला. महिलेने असमर्थता दर्शविताच तो तिला शरीरसंबंधाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा.मुलीला ठार मारण्याची धमकी२१ जुलै २०१७ च्या मध्यरात्रीपासून तो २४ डिसेंबर २०१८ च्या सकाळी ६ वाजेपर्यंत आरोपी गवडी आणि महिलेमध्ये अनेकदा शरीरसंबंध आले. महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी तिला वेळोवेळी पैशाची मागणी करीत होता. अलीकडे तिने पैसे देण्यास त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे तो महिलेसोबतच तिच्या मुलीलाही जीवे ठार मारण्याची धमकी देऊ लागला. त्याच्याकडून धोका होऊ शकतो, हे ध्यानात आल्याने अखेर तिने गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पीएसआय रवींद्र बारड यांनी गुन्हा दाखल केला. आरोपीला शोधण्यासाठी पोलीस पथक तेलंगणात जाणार आहे.