लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदेशी व्यक्तीसोबत फेसबूकवरून मैत्री करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. त्या ठगबाज मित्राने गिफ्ट पाठविण्याच्या नावाखाली आपल्या साथीदाराच्या मदतीने महिलेकडून ८६ हजार रुपये हडपले.स्मीता प्रवीण तपासे (वय ४१) असे पीडित महिलेचे नाव आहे. त्या चंदननगरात राहतात. तपासे यांना गेल्या वर्षी डिकडोल पॉवेल (रा. स्ट्रीट ग्लास्को, ५८ एनबी) नामक आरोपीने फेसबूकवरून फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली. तपासे यांनी ती स्विकारल्यानंतर हे दोघे फेसबूक तसेच व्हॉटस्अॅपवरून चॅटिंग करू लागले. आॅनलाईन मैत्री घट्ट झाल्यानंतर कथित डिकडोल पॉवेलने तपासे यांना आपल्या श्रीमंतीचा परिचय दिला. मैत्रीखातर तुम्हाला गिफ्ट पाठवायचे आहे, असा आग्रहही धरला. त्यानंतर १७ सप्टेंबर २०१७ ला त्याने तपासे यांना गिफ्ट पाठविल्याचा मेसेज दिला. दोन दिवसानंतर सुम्मी टोप्पो, रिना भाटिया आणि मेरी किपजेल (सर्व रा. न्यू दिल्ली) यांनी वेगवेगळे फोन करून दिल्ली विमानतळावर तुमचे गिफ्ट आल्याचे तसेच ते स्विकारण्यासाठी विशिष्ट शुल्क संबंधित बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. गिफ्ट सोडविण्यासाठी शुल्क जमा केले नाही तर दंड भरावा लागेल, असा धाकही दाखवला. त्यानुसार, १७ ते २६ सप्टेंबर २०१७ या ९ दिवसात तपासे यांनी आरोपीने सांगितलेल्या खात्यात ८६ हजार रुपये जमा केले. या घडामोडीला आता ९ महिने झाले. मात्र, आरोपींनी त्यांना गिफ्ट पाठविले नाही. प्रत्येक वेळी काही न काही कारण सांगून आरोपी रक्कम जमा करण्यास सांगत होते. त्यामुळे तपासे यांना संशय आला. त्यांनी आपल्याला गिफ्ट नको, आपली रक्कम परत करा,असे म्हटले असता आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे तपासे यांनी इमामवाडा ठाण्यात तक्रार नोंदवली. पीएसआय नेताम यांनी चौकशी करून रविवारी या प्रकरणी उपरोक्त चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.... तरीही फसतातच!ठिकठिकाणी अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. फेसबूकवरून फ्र्रेण्डशिप करून ठगबाजांची टोळी अनेकांना लाखोंचा गंडा घालत आहे. महिलांना पुरूष ठगबाज आणि पुरूषांना महिला ठगबाज फसवतात. नागपुरात एका वकिल आणि डॉक्टर तसेच प्राध्यापिकेचीही अशीच फसवणूक झाली आहे. यासंबंधाने वृत्तपत्रातून वेळोवेळी माहिती प्रकाशित होऊनही अनेक जण फसतातच.