लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूसंदर्भात आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुमारे दीड हजार नागरिकांची १४ दिवस कालावधीसाठी वास्तव्याची सुविधा करण्यासाठी आमदार निवाससह शासकीय व इतर इमारतीमध्ये अलगीकरण केंद्र स्थापित करण्यात आले आहे. त्यात आमदार निवास येथे २१० खोल्यांमध्ये सुमारे साडेचारशे व्यक्ती राहू शकतील अशी सुविधा करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कोरोना विषाणूसंदर्भात विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कोरोना विषाणूसंदर्भात आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस अलगीकरण केंद्रात (क्वारेन्टाईन सेंटर) राहणे बंधनकारक आहे. या ठिकाणी आवश्यक सुविधा जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या केंद्रात १५ प्रवाशांची सुविधा करण्यात आली आहे. दररोज येणार्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांना क्वारेन्टाईन केंद्रात आणण्याची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती डॉ. संजीव कुमार यांनी दिली.आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज येणार्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असून त्यादृष्टीने व्यवस्थेचा दैनंदिन आढावा घेण्यात येत असून त्यानुसार इतर शासकीय इमारतीमध्ये सुद्धा वाढ करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. शहरातील नागरिकांना आवश्यकतेनुसार होम क्वारेन्टाईन मध्ये ठेवण्यासंबंधी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे. तसेच होम क्वारेन्टाईन करण्यात आलेल्या व्यक्तीबाबत वेळोवेळी आरोग्याबाबत पाठपुरावा करुन खबरदारी घ्यावी यासाठी पोलीस विभागाचे सुद्धा सहकार्य घ्यावे.१०४ व्यक्तींच्या नमुन्यांचे तपासणीकोरोना विषाणूसंदर्भात आज १६ संशयित व्यक्ती आज दाखल झाले असून आजपर्यंत १३१ संशयितांची नोंद झाली आहे. त्यापैकी १६ व्यक्ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असून आतापर्यंत ९६ व्यक्तींची नोंद झाली आहे. त्यापैकी ९ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १०४ व्यक्तींचे तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहे. त्यापैकी ८१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.केंद्र शासनाच्या सूचनेनुसार १३१ व्यक्तींचा पाठपुरावा सुरु आहे. तसेच ३५ व्यक्तींना १४ दिवसाच्या पाठपुराव्यांतर्गत नोंदणीत आहेत. विमानतळावर २२ प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात आली असून एकूण १ हजार ४ व्यक्तींची स्क्रिनिंग करण्यात आली आहे. ७ प्रवाशांना अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले असून अलगीकरण केंद्रात एकूण १३ प्रवाशी आहेत.विविध उपाययोजनांसाठी नोडल अधिकारीजिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या असून त्याअंतर्गत विविध विभागाच्या अधिकार्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुषंगाने आज आदेश जारी केले.
- आयसोलेशन वार्डांची निर्मिती तसेच अहवाल सादर करणे : जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
- नियंत्रण कक्ष तसेच हेल्पलाईन २४ तास कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती : महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बहिरवार
- विदेशातून आलेले प्रवाशी त्यांचा पाठपुरावा : सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. इनामदार
- संभाव्य बाधित व्यक्तींची माहिती तसेच संपर्क : डॉ. नवघरे
- पोलीस विभागासंदभार्तील आवश्यक सहाय्य व पथक नियुक्त करणे : उपायुक्त श्वेता खेडकर
- अलगीकरण केंद्राची व्यवस्था : उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे,
- आमदार निवास व्यवस्था : जनार्दन भानुसे
- इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळा व्यवस्थापन : सहाय्यक प्रा. डॉ. खडसे, डॉ. मीनाक्षी सिंग व डॉ. सेलोकर
- होम क्वारेन्टाईन : डॉ. सरला लाड, डॉ. सेलोकर
- जनजागृती : जिल्हा शल्य चिकित्सक