नागपूर : हिरवाकंच मोठ्या डौलात उभा असलेला आणि शेंगामध्ये दाणे धरू पाहणारा शेतातील सोयाबीन काळवंडला आहे. हा प्रकार एक-दोन शेतात नसून भिवापूर तालुक्यासह नागपूर जिल्ह्याचा सीमावर्ती भाग असलेला चिमुर (जि. चंद्रपूर) व पवनी (जि. भंडारा) येथेही दिसून येतो आहे. शेतातील उभ्या स्वप्नांची राखरांगोळी झाल्याने शेतकरी चिंतित झाला आहे. भिवापूर तालुक्यात २० हजार ४१७ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड आहे.
अस्मानी संकटांचा सामना करीत शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनची पेरणी केली. ‘ॲलोमोझॅक’ ग्रस्त काही अपवादात्मक शेतकऱ्यांचा सोयाबीन वगळता १३ सप्टेंबरपर्यंत तालुक्यातील प्रत्येक शेतात हिरवाकंच सोयाबीन डौलात उभा होता. पन्नास टक्के शेंगाही धरल्या होत्या. दाणे बारीक असले तरी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गुणवत्ता प्राप्त भरीव सोयाबीन कापणीला येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. १४ व १५ सप्टेंबरला अनुक्रमे पोळा व पाडव्यामुळे शेतकरी थेट दोन दिवसांनी १६ सप्टेंबरला शेतात गेला.
बांधावरून शेतातील दृश्य बघताच, धक्का बसला. काल परवा हिरवाकंच असलेला सोयाबीन तासांतच काळवंडला. झाडे अचानक वाळून गेली. प्रत्येक शेतात ८० टक्के सोयाबीन वाळल्यागत झाला आहे. एकप्रकारे मृत पावलेल्या सोयाबीनची झाडे पुन्हा ऑक्सिजन घेण्याची शक्यता मुळीच नाही? त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची अक्षरश: राखरांगोळी झालेली आहे.
महत्त्वाचे म्हणजे रोग कोणता आणि प्रादुर्भाव कशाचा? याबाबत कुणाला काहीच कळताना दिसत नाही. उलटफेर वातावरण कारणीभूत ठरल्याचे सांगत, कृषी विभागही अनभिज्ञच असल्याचे दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे हा प्रकार एक-दोन शेतातील आणि गावातील नसून संपूर्ण तालुक्यात सोयाबीनचे पीक मागील दोन दिवसांत उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे. १० ते २० टक्के पीक थोडेबहुत शिल्लक असून तेसुद्धा हाताबाहेर गेले आहे.