देवेंद्र फडणवीस : ड्रॅगन पॅलेसही होणार जागतिक दर्जाचे नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने वैश्विक नेते आहेत. त्यामुळे लंडनपासून टोकिओपर्यंत बाबासाहेबांचे नेतृत्व जगापुढे आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कामठी येथे ओगावा सोसायटीतर्फे ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्षस्थानी होते. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खासदार कृपाल तुमाने, थायलंडच्या राजकुमारी लुयांग राजादारासिरी, ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे उपस्थित होत्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कामठी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र तसेच सभागृहाचे उद्घाटन, मल्टीपर्पज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आॅफ मेडिटेशन सेंटरचे भूमिपूजन व पर्यटन महामंडळातर्फे बांधण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, ड्रॅगन पॅलेसला भेट देण्यासाठी भारतीयच नव्हे तर विदेशातून लोक येत आहेत. हा परिसर जागतिक दर्जाचा व्हावा, यासाठी शासनातर्फे प्रयत्न करण्यात येत आहे. २१४ कोटी रुपयांचा एक आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला असून निधी प्राप्त झाल्यानंतर कामाला सुरुवात होईल. दीक्षाभूमीप्रमाणेच ड्रॅगन पॅलेसही जागतिक दर्जाचे करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अॅड. सुलेखा कुंभारे यांनी प्रास्ताविक व आभार मानले. (प्रतिनिधी)
बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने वैश्विक नेते
By admin | Published: October 24, 2015 3:26 AM