दुसरा टप्पा : तीन सिमेंट रस्त्यांच्या कामांचा समावेश नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शहरातील सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना सुरुवात होणार होती. परंतु विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. तीन महिन्यानंतर आवश्यक प्र्िरक्रया पूर्ण करण्यात आली असून रविवारी १३ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते दुसऱ्या टप्प्यातील तीन सिमेंट रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. पुढील वर्षात होत असलेल्या महापालिका निवडणुका विचारात घेता, भाजप नेतृत्वातील नागपूर विकास आघाडी सिमेंट रस्त्यांच्या कामाचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम भव्य व्हावा यासाठी महापालिकेतील पदाधिकारी व प्रशासन कामाला लागले आहे. शहरात ३२४ कोटींचे सिमेंट रस्ते तयार के ले जाणार आहेत. यातील १०० कोटी राज्य सरकारकडून प्राप्त झाले आहे. दुसऱ्या टप्यातील लॉ कॉलेज चौक, वैशालीनगर व भांडे प्लाट रस्त्यांचे भूमिपूजन केले जाणार आहे. उद्घाटनासाठी फडणवीस व गडकरी यांची वेळ घेण्यात आली आहे. त्यानुसार कार्यक्रमाच्या तयारीचे निर्देश देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त यांनी दिली.बुधवारपर्यत कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित केली जाणार आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश सिंगारे यांच्या कार्यकाळात ४० कोटींच्या सिमेंट रस्त्यांच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले होते. यातील उर्वरित तीन रस्त्यांच्या कामाचे लवकरच भूमिपूजन केले जाणार आहे. एकूण २२ पॅकेजमध्ये ७९ सिमेंट रस्त्यांचे काम केले जाणार आहे. यासाठी नासुप्रकडून १०० कोटींचा निधी प्राप्त होणार आहे. (प्रतिनिधी)
फडणवीस व गडकरी करणार सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन
By admin | Published: March 09, 2016 3:28 AM