कमलेश वानखेडे, नागपूर
नागपूर : आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करून वस्तुस्थिती समोर आणली होती. त्यानंतर आता फडणवीस यांची ही नवीन चाल आहे. फडणवीस हे सचिन वाझेला हाताशी धरून आपल्यावर आरोप करत आहेत, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. यावर फडणवीस यांनी सचिन वाझे यांनी मला पत्र पाठवले असे मी मिडियाच्या माध्यमातून ऐकत आहे. मी ते पत्र पाहिलेले नाही. कारण मी स्वतः दोन दिवसांपासून नागपुरात आहे. जे काही समोर येत आहे त्याची चौकशी करू, असे स्पष्ट केले.
फडणवीस यांनी खोटे शपथपत्र देण्यासाठी आपल्यावर दबाव आणला होता, असा आरोप यापूर्वी देशमुख यांनी केला होता. त्यावर फडणवीस यांनीही देशमुख यांचे अनेक पेन ड्राईव्ह आपल्याकडे असल्याचे उत्तर दिले होते. यावरून फडणवीस- देशमुख यांच्यात सामना रंगला असताना आता वाझे यांच्या कथित पत्रामुळे पुन्हा देशमुख यांनी फडणवीस यांच्यावर नेम साधला. देशमुख म्हणाले, सचिन वाझे हा गुन्हेगरी प्रवृत्तीचा आहे. खुनाचा आरोपी आहे. त्याच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येत नाही असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने वाझेबद्दल जे निरीक्षण नोंदविले त्याचा अभ्यास फडणवीस यांनी केलेला दिसत नाही. त्यांनी आधी त्याचा अभ्यास करुन आणि मग गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वाझेला आरोप करण्यास लावायला पाहिजे होते, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावर भाजपचे आ. डॉ. परिणय फुके यांनी उत्तर दिले. फुके म्हणाले, वाझे यांनी स्वतःची नार्को करावी अशी मागणी केली आहे. त्यात सत्य बाहेर येऊ द्या. जेव्हा वाझे यांना नोकरीत परत घेतले तेव्हा त्यांची विश्वासार्हता होती का, फडणवीस यांच्यावर देशमुख यांनी आरोप केल्यानंतर काही लोक मला भेटले. देशमुख यांनी कोलकाता येथे बऱ्याच छोटया कंपनीत पैसे गुंतवले असल्याचे सांगितले. याची मी स्वतंत्र एजंसी कडून माहिती घेत आहे. माहिती आल्यानंतर आपण हायकोर्टात याचिका दाखल करणार आहोत, असा इशाराही फुके यांनी दिला.
ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य फडणवीस - उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना यापुढे अब्दालीच म्हणणार, असे वक्तव्य केले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा ताबा सुटलेला आहे. ते अत्यंत नैराश्यात अश्या प्रकारचे शब्द वापरत आहेत. जेव्हा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या नैराश्यातून डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्याला फार उत्तर द्यायचे नसते. उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य आहेत हे आता त्यांनी दाखवून दिले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.