नागपूर : नागपूरचे भूमीपूत्र असलेले उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नागपूरकरांच्या हाती निधीचा ‘अमृत कलश’ सोपविला. मिहान परिसरात एक हजार एकरवर लॉजिस्टिक हब पार्क, मिहानसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद यासह विविध प्रकल्पांसाठी निधीची घोषणा करीत फडणवीस यांनी एकप्रकारे नागपूरकरांवर आपली छाप उमटविण्याचा प्रयत्न केला आहे. नागपूर महापालिकेच्या आगामी निवडणूक रणसंग्रामासाठी फडणवीसांनी भाजपच्या सरदारांना प्रचारासाठी एकप्रकारे दारुगोळाच पुरविला आहे.
एनएमआरडीए ने लॉजिस्टिक झोन म्हणून आमरावती रोडवरील गोंडखैरी- पेंढरी या परिसरात सुमारे एक हजार एकर जमीन राखीव ठेवली आहे. याच परिसरात लॉजिस्टिक हब उभारला जाण्याची शक्यता आहे. या हबमध्ये वेअर हाऊस व मल्टीमोडल पार्क उभारले जातील. नागपूर सह पूर्व विदर्भातील कारखान्यांमध्ये उत्पादित होणारा माल येथे साठवला जाईल. येथून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून हा माल मुंबईपर्यंत जलदगतीने पोहचविला जाईल. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून विदर्भाच्या अर्थचक्राला गती मिळणार आहे.
मिहानच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली. यामुळे येथील पायाभूत सुविधांचा विकास होईल, रखडलेली विकास कामे मार्गी लागतील, रोजगार निर्मीती वाढेल व मिहानला भरारी घेण्यास मदत होईल.
नागपुरात कृषी सुविधा केंद्र, विदर्भात संत्रा प्रक्रिया केंद्र
- नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करण्यात येईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा याचा मुख्य उद्देश असेल. या केंद्रासाठी २२८ कोटी रुपये देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. तसेच नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र स्थापन केले जातील. यासाठी सुद्धा २० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
नागपूरला काय मिळाले ?
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार होणार.
-नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा सुरु होणार ( ४३.८० कि.मी./६७०८ कोटी लागणार)
-मानकापूर विभागीय क्रिडा संकुलास १०० कोटी
- गोरेवाड्यात यंदापासून आफ्रिकन सफारी व पक्षी उद्यान
- एलआयटीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला विशेष निधी मिळणार.
- नागपुरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला इमारत बांधकामासाठी निधी मिळणार.
- नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा उद्देश. या केंद्रासाठी २२८ कोटी रुपये.
- नागपुरात संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी ६ कोटी.
- विदर्भ साहित्य संघासाठी १० कोटी.
- राज्यभरात उभारण्यात येणाऱ्या शिवचरित्र उद्यानात नागपूरचाही समावेश.