नागपूर : राज्यात सत्ताबदल होईल व नागपूरकर देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अपेक्षेवर अचानक आलेल्या राजकीय ट्विस्टमुळे पाणी फेरल्या गेले. राजकीय वर्तुळात हा फडणवीसांचा ‘मास्टर स्ट्रोक’ असल्याचे दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात भाजप कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या गोटात यामुळे संभ्रमाचे वातावरण होते व कार्यकर्त्यांकडून याबाबत एकमेकांना विचारणा करण्यात येत होती.
शिंदे गटाच्या आमदारांचे समर्थन घेत फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असा अंदाज होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री शहरात जल्लोषदेखील केला. मात्र, २४ तासांच्या आत जल्लोष थंड पडला. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर परत नागपूरची चलती होईल व आपलादेखील रुबाब वाढेल या अपेक्षेत अनेक समर्थक होते. मात्र, एकनाथ शिंदे यांचे नाव फडणवीस यांनी घोषित केल्यावर बहुतांश जणांना ‘शॉक’ बसला.
कुणी म्हणे ‘मास्टर स्ट्रोक’ तर कुणी राजकीय गुगली
फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केल्यावर कार्यकर्त्यांना बराच वेळ काहीच कळले नाही. मात्र, त्यानंतर स्थिती सावरत कुणी फडणवीसांच्या या चालीला ‘मास्टर स्ट्रोक’ असल्याचे नाव दिले तर कुणी ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना निष्प्रभ करण्यासाठी टाकलेली राजकीय गुगली असल्याचे भाष्य केले. मात्र, प्रत्यक्षात कार्यकर्ते हिरमुसले असल्याचेच चित्र होते.
नियोजित जल्लोषावर पाणी
देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे राजभवनात राज्यपालांची भेट घेण्यासाठी गेले असताना भाजपच्या महानगर पदाधिकाऱ्यांकडून धंतोली येथील कार्यालयासमोर सायंकाळी सहा वाजता जोरदार जल्लोष करणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, राजकीय ट्विस्ट आल्यानंतर मात्र ऐनवेळी हा जल्लोषाचा कार्यक्रमच रद्द करण्यात आला. भाजपचे एकनाथ शिंदे यांना समर्थन असले तरी फडणवीस मुख्यमंत्री होणार नसल्याने कार्यकर्त्यांचा ‘मूड ऑफ’ झाला होता.