नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या मारहाणीत मृत झालेल्या मनोज ठवकर याच्या पारडी येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सोमवारी भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
या प्रकरणातील दोषी पोलिसांवर तातडीने कारवाई व्हावी. केवळ बदली नाही, तर त्यांना निलंबित केले पाहिजे.
या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.
या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, यासाठी आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करूच.
पण, भारतीय जनता पार्टीच्या वतीने तातडीची दोन लाख रुपये मदत देत असल्याचेही जाहीर केले.
पोलीस विभागात शिस्त असलीच पाहिजे. जे गुन्हे चालान करण्याचे आहेत, तेथे मारहाणीसारखे प्रकार होता कामा नये! लॉकडाऊनच्या काळातसुद्धा राज्यात १४ टक्के गुन्हे वाढले आहेत. गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचे काम राज्य सरकारने केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आ. कृष्णा खोपडे, शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, पांडुरंग मेहर, बाल्या बोरकर, प्रमोद पेंडके, संजय अवचट, नगरसेवक दीपक वाडीभस्मे, वैशाली वैद्य, जयश्री रारोकर, मनीषा अतकरे, देवेंद्र मेहर, सचिन करारे, चंदन गोस्वामी, संजय मानकर, देवेंद्र बिसेन, अनिल कोडापे, बंडू फेद्देवार, पिंटू टिचकुले, विकास मिश्रा, संगीता गुप्ता आदी उपस्थित होते.