नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिल्लीतून अनेक नेते पाठविलेले आहेत. त्यांच्यावर वॉच ठेवायसाठी की अधिकार कमी करायला, यावरून हे दिसतेय की त्यांचे पंख छाटण्याचे काम पद्धतशीरपणे हायकमांड करत आहे. दिल्लीचे दोन्ही नेते मोदी- शहा यांची जर माणूस उपयुक्त नसेल तर बाजूला सारण्याची पद्धत आहे, अशी टीका विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करून राज्यभर फिरले. लोकसभेतही त्यांनी बाळासाहेबांचा फोटो वापरला. जर ते शिंदे हे नाव लिहून शिवसेनेची ओळख शिंदे गट अशी करत असतील तर शिंदे गटाला त्यांची ताकद काय आहे, या नावाला वजन किती आहे हे जनता याला दाखवून देईल, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. महाविकास आघाडीत जागा वाटपात अनेक जागांवर एकमत आहे. १२५ जागांवर कुठेही अडचण नाही. गणपती विसर्जनानंतर बैठक होत आहे. शिवसेना जर मुस्लिम उमेदवार देत असेल तर त्यात काही वावगे नाही, ते लोकशाहीला मानतात, संविधानाला म्हणतात असा त्याचा अर्थ होतो, असेही वडेट्टीवार म्हणाले.
अजित पवारांवर मीठ चोळण्याचे काम
अजित पवार यांना जेवढे दुखवता येईल, तेवढे जखमेवर मीठ चोळण्याचा काम भाजपकडून सुरू आहे. जखम एवढी मोठी झाली पाहिजे की आपोआप माणसे दूर करता येतात. बारामतीत काल त्यांचे संयुक्त पत्रकार परिषद झाली. अजित पवारांनी एकदाही मुख्यमंत्र्याकडे बघितले नाही. सर्वांचे चेहरे पडले होते. परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सत्तेच्या लढाईमध्ये कमजोर दुवा असतो त्याला बाजूला करण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत. त्यामध्ये पहिला नंबर कदाचित हा अजित पवारांचा असेल आणि दुसरा नंबर एकनाथ शिंदेंचाही असू शकतो, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.