नागपूर : वेदांता-फॉक्सकॉनच्या पाठोपाठ नागपुरातील मिहानमध्ये प्रस्तावित टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा मुद्द्यावरून आता काँग्रेस- राष्ट्रवादीने नागपूर-विदर्भ कर्मभूमी असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरले आहे.
वेगळा विदर्भ आणि विदर्भाच्या अनुशेषाच्या मुद्द्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या आहेत. सत्ता, मुख्यमंत्रिपद, उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यावर मात्र त्यांना विदर्भाचा विसर पडतो. विदर्भातील जनतेची मते घेऊन विदर्भात येणारे प्रकल्प गुजरातला पाठवण्याचे काम फडणवीस करत आहेत, अशी बोचरी टीका काँग्रेस- राष्ट्रवादीने केली आहे.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, फडणवीसांसाठी विदर्भातील जनतेपेक्षा गुजरातच्या साहेबांचे आदेश महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांनी पुढची निवडणूक गुजरातमधूनच लढवावी. फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री असताना एकही मोठा प्रकल्प विदर्भात आला नाही. विदर्भातील तरुणांना रोजगार मिळाला नाही. रामदेवबाबा यांच्या पतंजलीचा मोठा प्रकल्प नागपूरमध्ये येणार असे सांगितले होते, पण तो अद्याप साकारला नाही. अमरावतीतील टेक्सटाइल पार्क औरंगाबादच्या ऑरिक सिटीमध्ये घेऊन जाण्याचा घाट शिंदे -फडणवीस सरकारने घातला असल्याचा आरोपही लोंढे यांनी केला.
राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे म्हणाले, टाटा एअरबसचा २२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प गुजरातला गेल्याने विदर्भाचे प्रचंड नुकसान होणार आहे. विदर्भातील तरुणांना नोकरी, रोजगारासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद यासारख्या मोठ्या शहरांची वाट धरावी लागणार आहे. वेदांता-फॉक्सकॉन महारष्ट्रातून गेला तेव्हा लवकरच महाराष्ट्रात नवा प्रकल्प देणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रकल्प देण्याऐवजी पळविण्याचे काम सुरू असल्याची टीका पेठे यांनी केली.