कमल शर्मा
नागपूर :महावितरणने राज्यभरात लावलेल्या वीज मीटरपैकी सुमारे ९.६ लाख मीटरमध्ये बिघाड आहे. महावितरणच्या अहवालात याचा खुलासा झाला आहे. याचा फटका सामान्य ग्राहकांना सहन करावा लागत आहे. मीटरमध्ये बिघाड असतानाही महावितरण बिलाचे समायोजन करण्यास तयार नाही. चुकीच्या रीडिंगनुसारच ग्राहकांना बिल भरावे लागत आहे. महावितरणचे नवनियुक्त अध्यक्ष तथा सह व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र हे पदभार स्वीकारल्यानंतर आज, मंगळवारी कंपनीच्या राज्यभरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी मीटरच्या स्थितीचादेखील आढावा घेतला जाईल.
महावितरणचे कर्मचारी मीटरचा तुटवडा असल्याचे कारण देत बदलून देण्यास टाळाटाळ करीत आहेत. परिणामी ग्राहकांना दुप्पट पैसे मोजून बाजारातून मीटर खरेदी करावे लागत आहेत. विदर्भात अशा ‘फॉल्टी’ मीटरची संख्या २.२५ लाख आहे. नागपूर झोनमध्ये २५ हजार, गोंदिया १२ हजार ,चंद्रपूर २९ हजार, अमरावती ८० हजार व अकोला येथे ७८ हजार मीटर फॉल्टी आहेत.
आता वीज मीटरचा पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा महावितरण करीत आहे. एकूण ग्राहकांची संख्या ३ कोटी आहे. ३ टक्के मीटर फॉल्टी आहेत. कंपनीला फॉल्टी मीटर बदलण्यासाठी दरमहा सुमारे दोन लाख मीटरची गरज भासते. याशिवाय नव्या कनेक्श्नसाठी देखील मीटरची मागणी असते.
विभाग -फॉल्टी मीटर
- नागपूर -२.२५ लाख
- औरंगाबाद - २.४३ लाख
- कोकण -३.२८ लाख
- पुणे -१.६३ लाख
मीटरचा तुटवडा का ?
- केंद्र सरकारच्या निर्देशावर आता महाराष्ट्रात स्मार्ट मीटर लागणार आहेत. १५ हजार कोटी रुपयांच्या एकूण ७ निविदा जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महावितरणने परंपरागत मीटरवर दुर्लक्ष केले आहे. यावर्षी ऊन कडक आहे. त्यामुळे मीटर जळण्याची संख्या वाढली आहे. यामुळे मीटरची मागणी वाढली आहे.
कंपनीला फॉल्टी मीटर बदलण्यासाठी दहमहा सुमारे दोन लाख मीटरची गरज भासते. याशिवाय नव्या कनेक्शनसाठीदेखील मीटरची मागणी असते.