नागपूर : प्रवाशांना बसमध्ये विविध प्रकारचे भाडेसवलत देण्यासाठी राज्य सरकारने घोषित केलेल्या स्मार्ट कार्ड योजनेचा अल्पावधितच फज्जा उडाला आहे. नागपूर जिल्ह्यात तर या योजनेची एक लाख कार्डाचीही पूर्ती होऊ शकली नाही. केवळ ५९ हजार कार्डावरच ही योजना थांबली आहे.
बसमध्ये प्रवास करणाऱ्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, खेळाडू, पत्रकार, विविध पुरस्कार प्राप्त समाजसेवक आणि अशाच सुमारे २९ समाजघटकांना प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. त्यासाठी त्यांना वेगवेगळे ओळखपत्र बसच्या वाहकाला दाखवणे बंधनकारक आहे. उदा. ज्येष्ठ नागरिकाला वयाचे तर पत्रकाराला अधिस्विकृती धारक असल्याचे कार्ड दाखवावे लागायचे. जुलै मध्ये एसटी महामंडळाने प्रवाशाला बस भाड्यासंबंधीची कोणतीही सवलत हवी असल्यास त्याला स्मार्ट कार्ड बंधनकारक राहिल, असे जाहिर केले.
एकच स्मार्ट कार्ड सर्व प्रकारच्या सवलतीसाठी पात्र राहिल, असेही सांगण्यात आले. स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी सप्टेंबरअखेरची तारिख देण्यात आली. त्यामुळे सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांनी, ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी विविध आगारात धाव घेतली. अचानक गर्दी वाढल्याने एसटीच्या स्मार्ट कार्डचे सर्व्हर घरघर करू लागले. नमूद मुदतीत स्मार्ट कार्ड देऊ शकणार नाही, हे लक्षात आल्याने स्मार्ट कार्ड तयार करण्याची मुदत दोनदा वाढविण्यात आली.
मुदत जरी वाढविण्यात आली तरी कार्ड तयार करण्याची प्रक्रिया रेंगाळल्याने अनेक आगाराच्या खिडक्यांवरून संबंधित प्रवासी गेल्यापावली मागे परतू लागले. आता तर जवळपास जिकडे तिकडे स्मार्ट कार्ड बनविण्याची प्रक्रियाच बंद पडली. विशेष म्हणजे, आठ आगार असलेल्या नागपूर जिल्ह्यात केवळ ५९,५३६ कार्ड तयार करून देण्यात आले आहे. यातील ४९५१९ कार्ड ज्येष्ठ नागरिकांचे आहे. तर अन्य बाकी कॅटेगिरीतील प्रवाशांचे आहे.
योजना गुंडाळण्याची तयारी ?
स्मार्ट कार्ड बनवून देण्यासंबंधितचा एसटीचा वेग लक्षात घेता ही योजना गुंडाळली जाते की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. या संबंधाने एसटीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ते वरिष्ठांकडून या संबंधाने स्पष्ट काहीही कळायला मार्ग नसल्याचे सांगितले जाते.