आनंद शर्मा
नागपूर : रेल्वे प्रवाशांना आरक्षण खिडक्यांवरून सहजरीत्या तिकीट खरेदी करता यावे यासाठी भारतीय रेल्वेच्या वतीने विविध आरक्षण कार्यालयात आरक्षण खिडक्यांवर फेअर डिस्प्ले बोर्ड लावण्यात आले आहेत. यात वेळेनुसार बदलही होत आहे. पूर्वी विना जाहिरातीचे बोर्ड होते. त्यांच्या ठिकाणी आता जाहिराती असलेले बोर्ड लागले आहेत. असे बोर्ड नागपूर रेल्वेस्थानकावरील आरक्षण खिडक्यांवर लागले आहेत. परंतु अजनी आरक्षण कार्यालयातील आरक्षण खिडक्यांवर आताही जुनेच बोर्ड लावलेले आहेत. अनेक दिवसांपासून हे बोर्ड ठप्प पडले आहेत. यामुळे रेल्वे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना असुविधा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अजनी आरक्षण कार्यालयातील सर्व चार आरक्षण खिडक्यांवर काही वर्षांपूर्वी फेअर डिस्प्ले बोर्ड लावण्यात आले होते. रेल्वे प्रवाशाने खिडकीवर दिलेल्या आरक्षणाच्या अर्जावर लिहिलेली माहिती रेल्वे कर्मचाऱ्याने संगणकात टाकल्यानंतर या बोर्डावर संबंधित माहिती म्हणजे रेल्वेगाडी क्रमांक, कोठे प्रवास करायचा, क्लास, भाडे आदी माहिती दिसते. परंतु मागील नऊ महिन्यांपासून हे बोर्ड बंद आहेत. या बोर्डवर संबंधित माहिती दाखविली जात नाही. ही माहिती या बोर्डवर स्पष्टपणे दिसत नाही. यामुळे प्रवासी आणि आरक्षण खिडकीवरील क्लर्क यांना आपसात वारंवार रेल्वेगाडी, कोठे प्रवास करायचा, क्लास, भाडे याची माहिती विचारावी लागते. कोरोनाच्या काळात सुरक्षा महत्त्वाची आहे. अशा स्थितीत काऊंटरवरील क्लर्क आणि प्रवाशांचे एकमेकांशी अधिक बोलणे धोक्याचे आहे. परंतु बोर्ड बंद पडल्यामुळे तिकीट देण्यासही वेळ लागत आहे.
...........
दररोज येतात ४०० अर्ज
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अजनी आरक्षण खिडक्यांवर कोरोनाच्या पूर्वी दररोज सरासरी १ हजार आरक्षणाचे अर्ज येत होते. परंतु कोरोनामुळे ही संख्या ४०० वर आली आहे. त्यामुळे ४०० प्रवाशांना फेअर डिस्प्ले बोर्ड ठप्प झाल्याचा फटका बसत असल्याची स्थिती आहे.
रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे
‘अजनी आरक्षण खिडक्यांवर फेअर डिस्प्ले बोर्ड बंद असल्यामुळे तिकीट खरेदी करताना त्रास होतो. कोरोनाच्या काळात अधिक गर्दी होऊ न देणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने बंद पडलेले फेअर डिस्प्ले बोर्ड त्वरित सुरू करण्याची गरज आहे.’
-सतीश यादव, झेडआरयूसीसी, सदस्य, मध्य रेल्वे
लवकरच बदलणार बोर्ड
‘अजनी आरक्षण खिडक्यांवर बंद पडलेल्या फेअर डिस्प्ले बोर्ड बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. या मशीनचे पार्ट बंगळुरवरून येणार आहेत. कोरोनामुळे हे पार्ट येण्यास वेळ लागला. लवकरच हे बोर्ड दुरुस्त करण्यात येतील.’
-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
..........